मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांचे निर्देश
छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो): विशेष सखोल पुनरीक्षणाच्या पुढील टप्प्यात प्रारूप मतदार यादीच्या अनुषंगाने प्राप्त होणाऱ्या अर्ज, सूचना व हरकतींवर तत्परतेने कार्यवाही करण्यासाठी सक्षम यंत्रणा सज्ज ठेवावी. मतदार यादीतील नोंदींची पडताळणी, नमुना क्रमांक ६, ७व ८ मधील अर्जावर कार्यवाही आणि आवश्यक दुरुस्त्या नियमानुसार पूर्ण करताना प्रक्रिया सुलभ, पारदर्शक व नागरिकाभिमुख ठेवावी, असे निर्देश मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांनी दिले.
विभागातील विशेष सखोल पुनरीक्षणाच्या कामाचा चोक्कलिंगम यांनी स्मार्ट सिटी कार्यालयात आढावा घेतला.
त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी विभागीय आयुक्त जी. श्रीकांत, जिल्हाधिकारी विनय गौडा जी. सी., जालना जिल्हाधिकारी आशिमा मित्तल, बीड जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन, नांदेड जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, परभणी जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण, लातूर जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड, सहआयुक्त मंजुषा मिसकर यांच्यासह संबंधित
आठही जिल्ह्यांतील उपजिल्हा निवडणूक अधिकारी, निवडणूक नोंदणी अधिकारी, सहाय्यक निवडणूक नोंदणी अधिकारी तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते.
चोक्कलिंगम म्हणाले, विशेष सखोल पुनरीक्षणाच्या कामाला गती देण्यासाठी मतदार यादीची पाने आणि नोटिसांची छपाई नियोजनबद्ध पद्धतीने वेळेत पूर्ण करावी. यासाठी जिल्हानिहाय
नियोजन करावे, असे निर्देश त्यांनी दिले. यावेळी विभागातील आठही जिल्ह्यांतील छपाईची कामे, उपलब्ध यंत्रसामग्री, संबंधित संस्थांची क्षमता आणि कामाचे नियोजन यांचा त्यांनी आढावा घेतला.
प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध झाल्यानंतर नागरिकांकडून प्राप्त होणाऱ्या सूचना व अर्जावर तातडीने कार्यवाही करण्यासाठी संबंधित यंत्रणा सक्रिय ठेवावी.
इतर राज्यांचा पद्धतीचा अवलंब करा नोटीस बजावणे, कागदपत्रांचे संकलन आणि प्राथमिक
पडताळणीसाठी स्थानिक परिस्थितीनुसार योग्य पद्धत स्वीकारावी. पात्र मतदारांचे उपलब्ध मोबाईल क्रमांक, फोटो ओळखपत्र तसेच इतर वैध ओळखपत्रांच्या माध्यमातून संपर्क व पडताळणीची प्रक्रिया सुलभ करता येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. याबाबतीत इतर राज्यांमध्ये अवलंबिलेल्या चांगल्या पद्धतींचा अभ्यास करून त्यांचा अवलंब करता येईल, असे त्यांनी सांगितले.
एखाद्या नागरिकाचे नाव प्रारूप यादीत आढळून न आल्यास त्याची सध्याची निवासस्थिती तपासून आवश्यकतेनुसार नमुना क्रमांक ६ भरून घेऊन नियमानुसार कार्यवाही करावी. नागरिकांना प्रक्रिया व अर्जाबाबत स्पष्ट आणि सुलभ मार्गदर्शन उपलब्ध करून द्यावे, असे त्यांनी सांगितले. यावेळी एसआयआरच्या पुढील टप्प्यात पात्र मतदारांची नावे मतदार यादीत कायम राहतील
तसेच दावे व हरकतींची प्रक्रिया पारदर्शक व नियमानुसार पूर्ण होईल, यासाठी जिल्हानिहाय यंत्रणा सज्ज ठेवावी. प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध झाल्यानंतर नागरिकांनी आपले नाव तपासून आवश्यक असल्यास विहित मुदतीत दावा किंवा हरकत दाखल करावी. तसेच अनमॅप्ड मतदारांच्या प्रकरणांमध्ये निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार कार्यवाही करावी.















