घनघोर युद्धाची शक्यता...! अमेरिका खर्ग बेटावर लष्करी कारवाईची करतोय तयारी, इराण पसरवतोय सुरुंग...

Foto
नवी दिल्ली : मध्य पूर्वेतील युद्धाने आता टोकाची मर्यादा ओलांडली आहे. इराणचे सर्वात महत्त्वाचे तेल निर्यात केंद्र असलेल्या खर्ग बेटावर अमेरिका ताबा मिळवण्याची शक्यता निर्माण झाली आहे. हे रोखण्यासाठी इराणने अत्यंत आक्रमक पाऊल उचलले असून, बेटाच्या सभोवतालच्या समुद्रात मोठ्या प्रमाणावर सागरी सुरुंग पेरल्याचे वृत्त समोर आले आहे.

खर्ग बेट हे इराणच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे. इराणच्या एकूण कच्च्या तेलाच्या निर्यातीपैकी 90% पेक्षा जास्त निर्यात याच बेटावरून होते. जर अमेरिकेने या बेटावर ताबा मिळवला किंवा हे बंदर उद्ध्वस्त केले, तर इराणची अर्थव्यवस्था पूर्णपणे कोलमडून पडेल.

अमेरिकन नौदलाच्या हालचाली रोखण्यासाठी इराणने पर्शियन आखातातील या मोक्याच्या ठिकाणी सुरुंग पेरले आहेत. यामुळे केवळ लष्करी जहाजेच नव्हे, तर व्यापारी तेल टँकर्सनाही मोठा धोका निर्माण झाला आहे. इराणने इशारा दिला आहे की, जर त्यांच्या भूभागावर हल्ला झाला, तर ते संपूर्ण जगाचा इंधन पुरवठा रोखून धरतील.

पेंटागॉनमधील सूत्रांनुसार, अमेरिकन लष्कर खर्ग बेटावर सर्जिकल स्ट्राईक किंवा ताबा मिळवण्याच्या रणनीतीवर काम करत आहे. मात्र, इराणने लावलेल्या सुरुंगांमुळे अमेरिकेच्या एअरक्राफ्ट कॅरिअर्स आणि युद्धनौकांसाठी हे ऑपरेशन अत्यंत जोखमीचे ठरू शकते. अमेरिकन लष्कराला खर्ग बेटावर ताबा मिळवून इराणवर दबाव टाकायचा आहे, जेणेकरून होरमुझची सामुद्रधुनी तेल वाहतुकीसाठी खुली करता येईल. मात्र, अमेरिकन लष्करी तज्ज्ञांच्या मते, अशा प्रकारच्या जमिनीवरील मोहिमेत मोठ्या प्रमाणावर अमेरिकन सैनिक मारले जाण्याची दाट शक्यता आहे.

जागतिक बाजारात खळबळ
या बातमीमुळे जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमतींनी उच्चांक गाठला आहे. होरमुझची सामुद्रधुनी आणि खर्ग बेटावरील तणावामुळे भारतासह अनेक आशियाई देशांमध्ये इंधन टंचाई निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

ट्रम्प म्हणाले, लवकर सोक्षमोक्ष लावा, मला इतरही अनेक कामे...
 अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणसोबत सुरू असलेले युद्ध अधिक लांबवण्यास स्पष्ट नकार दिला आहे. येत्या काही आठवड्यांतच हे युद्ध संपवण्याचे लक्ष्य त्यांनी आपल्या सल्लागारांना दिले असून, मे महिन्याच्या मध्यावर होणाऱ्या चीन आणि शी जिनपिंग यांच्या भेटीपूर्वी इराणचा प्रश्‍न निकालात काढण्याचे त्यांचे नियोजन आहे.

वॉल स्ट्रीट जर्नलच्या वृत्तानुसार, ट्रम्प यांनी 4 ते 6 आठवड्यांची कालमर्यादा निश्‍चित केली आहे. मे महिन्यात बीजिंगमध्ये होणाऱ्या शिखर परिषदेपूर्वी मध्यपूर्वेतील तणाव निवळल्यास ट्रम्प यांना जागतिक स्तरावर आपली प्रतिमा अधिक मजबूत करता येईल, असा व्हाईट हाऊसचा अंदाज आहे.

ट्रम्प यांनी आपल्या सल्लागारांसमोर एक प्रस्ताव ठेवला आहे, ज्यानुसार शांतता कराराच्या बदल्यात अमेरिका इराणच्या तेल साठ्यांपर्यंत थेट पोहोच मिळवू शकते. मात्र, यावर अद्याप कोणतीही अधिकृत योजना तयार झालेली नाही. ट्रम्प यांना युद्धापेक्षा आता देशांतर्गत मुद्द्यांवर, जसे की मध्यावधी निवडणुका, इमिग्रेशन आणि मतदार पात्रता कायदे, यावर लक्ष केंद्रित करायचे आहे.

वाढती जीवितहानी आणि राजकीय दबाव
युद्ध लांबल्यास अमेरिकन सैनिकांच्या मृत्यूचा आकडा वाढू शकतो, ही ट्रम्प यांची मुख्य चिंता आहे. आतापर्यंत या युद्धात 13 अमेरिकन सैनिकांचा मृत्यू झाला असून 300 हून अधिक जखमी झाले आहेत. तसेच, युद्धामुळे वाढलेली महागाई आणि फ्लोरिडासारख्या महत्त्वाच्या ठिकाणी रिपब्लिकन पार्टीचा झालेला पराभव यामुळे ट्रम्प यांच्यावर राजकीय दबाव वाढत आहे.

लष्करी कारवाईचा इशारा
एककीकडे कूटनीतिक चर्चा सुरू असली, तरी व्हाईट हाऊसच्या प्रेस सचिव कॅरोलिन लेविट यांनी इशारा दिला आहे की, जर इराण करारासाठी पुढे आला नाही, तर अमेरिका आतापर्यंतचा सर्वात भीषण हल्ला करण्यास मागेपुढे पाहणार नाही.