छत्रपती (सांजवार्ता ब्युरो) संभाजीनगर, : हलक्या पावसादरम्यान हसूल परिसरातील यासीन नगर येथील शाहीद किराणा दुकानाजवळील गल्लीत मोठी दुर्घटना थोडक्यात टळली. परिसरातील काही लहान मुले आणि मुली पावसाचा आनंद घेत रस्त्यावर खेळत व भिजत असताना अचानक विद्युत खांबावरील वीजतार तुटून खाली पडल्याने एकच खळबळ उडाली.
सुदैवाने तुटलेली वीजतार कोणत्याही बालकाच्या संपर्कात आली नाही आणि कोणालाही इजा झाली नाही. परिसरातील नागरिकांनी प्रसंगावधान राखत मुलांना तातडीने सुरक्षित ठिकाणी हलवले. त्यामुळे काही क्षणांच्या फरकाने संभाव्य मोठा अनर्थ टळला. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच महावितरण (एमएसईबी) चे कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी तुटलेल्या वीजतारेची दुरुस्ती करून परिसर सुरक्षित केला आणि संभाव्य धोका दूर केला. त्यांच्या तत्पर कारवाईमुळे स्थानिक नागरिकांनी समाधान व्यक्त करत कर्मचाऱ्यांच्या
कार्याचे कौतुक केले. या घटनेच्या पार्श्वभूमीवर गब्बर अॅक्शन समितीचे हफिज अली यांनी पावसाळ्यात लहान मुलांना साचलेल्या पाण्यात किंवा रस्त्यावर पावसात खेळण्यासाठी विनाकारण जाऊ देऊ नये. तसेच वीजखांब, वीजतारा आणि इतर विद्युत उपकरणांपासून सुरक्षित अंतर राखावे. पावसाच्या काळात ओलाव्यामुळे विजेचा धोका वाढू शकतो, त्यामुळे पालकांनी मुलांवर सतत लक्ष ठेवून आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे त्यांनी सांगितले.
https://epaper.sanjwarta.in/Powered By: Vrudhee Solutions













