दहावी, बारावी बोर्ड परीक्षेच्या तयारीला आला वेग, आज दुपारनंतर महत्वपूर्ण बैठक

Foto
छत्रपती संभाजीनगर,(सांजवार्ता ब्युरो): महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळाच्या वतीने घेण्यात येणार्‍या दहावी आणि बारावी प्रमाणपत्र परीक्षा -२०२६ ची तयारी सुरू झाली आहे. विद्यार्थ्यांकडून आवेदन पत्र भरणे प्रक्रिया देखील सुरू आहे. बोर्डाकडून देखील जोरदार तयारी केली जात असून आज पूर्व तयारी बैठक घेऊन विविध विषयांवर चर्चा केली जाणार असल्याची माहिती बोर्डाचे विभागीय अध्यक्ष अनिल साबळे यांनी दिली.

बोर्डाच्या वतीने दहावी आणि बारावी बोर्ड परीक्षेची तयारी सध्या सुरू झाली आहे. शाळेत, महाविद्यालयात देखील विद्यार्थी अभ्यासावर भर देत आहेत. तर काही केंद्राकडून मंडळ मान्यता घेण्यासाठी देखील धावपळ सुरू आहे. दरवर्षी कॉपीमुक्त परीक्षेसाठी बोर्डासमोर मोठे आव्हान असते. यावर्षी देखील शंभर टक्के कॉपीमुक्त परीक्षा व्हावी यासाठी उपाययोजना केली जाणार आहे. त्यासाठी कॉपीमुक्त अभियान राबविण्यासाठी देखील उपाय योजना केली जात आहेत. यंदा वीस दिवस अगोदरच आवेदन पत्र भरणे प्रकिया देखील बंद होणार आहे. त्यासाठी देखील बोर्डाकडून नियोजन करणे सुरू झाले आहे. परीक्षेच्या नियोजनासाठी आज बैठक घेऊन विविध निर्णय घेतले जाणार आहे. याकडे शाळा आणि महाविद्यालयांचे देखील लक्ष लागले आहे.

याविषयावर होणार निर्णय

आज दुपारनंतर बोर्डाच्या वतीने घेण्यात येणार्‍या बैठकीत बोर्डाच्या परीक्षेबाबत निर्णय घेतले जाणार आहे. त्यात प्रामुख्याने काही केंद्र बंदही करण्याचा निर्णय होईल तर काही केंद्राना मंडळ मान्यतेवर देखील चर्चा केली जाणार आहे. तसेच सर्वात महत्त्वाचे म्हणजे परीक्षेत होणारे गैरप्रकार यावर देखील चर्चा करून सुरळीत परीक्षा पार पाडण्यासाठी नियोजन केले जाणार आहे.