नवी दिल्ली : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा एकदा परदेशी दौर्यावर जात आहेत. परराष्ट्र मंत्रालयाने पंतप्रधान मोदी यांच्या तीन देशांच्या दौर्याची माहिती दिली आहे. यातील असा एक देश आहे, जिथे भारताचे पंतप्रधान तब्बल ४० वर्षांनी पाऊल ठेवणार आहेत. या तीनही देशांचा दौरा अनेकार्थाने महत्त्वपूर्ण मानला जात आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी ६ ते ११ जुलै दरम्यान इंडोनेशिया, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडचा दौरा करणार आहेत. या तीन देशांसोबत भारताचे सामरिक, आर्थिक आणि द्विपक्षीय संबंध अधिक दृढ करणे, हा या दौर्याचा उद्देश आहे. पंतप्रधान मोदी आपल्या दौर्याची सुरुवात इंडोनेशिया या देशापासून करणार आहेत. त्यानंतर ते ऑस्ट्रेलियाला जातील, जिथे मेलबर्नमध्ये त्यांचे प्रमुख कार्यक्रम पार पडतील. पंतप्रधान मोदी यांच्या तीन देशांच्या या दौर्याचा अंतिम टप्पा न्यूझीलंडमध्ये असेल, अशी माहिती देण्यात आली आहे.
परराष्ट्र मंत्रालयाच्या माहितीनुसार, न्यूझीलंडचा हा दौरा ऐतिहासिक ठरेल, कारण जवळपास ४० वर्षांत प्रथमच एखादे भारतीय पंतप्रधान अधिकृत दौर्यावर न्यूझीलंडला भेट देणार आहेत. न्यूझीलंडचे पंतप्रधान क्रिस्टोफर लक्सन यांनी सोशल मीडियाद्वारे पंतप्रधान मोदींच्या दौर्याची घोषणा केली. ते म्हणाले की, भारत ही जगातील सर्वांत मोठ्या आणि वेगाने वाढणार्या अर्थव्यवस्थांपैकी एक असून न्यूझीलंडच्या आर्थिक समृद्धीसाठी एक महत्त्वपूर्ण भागीदार आहे.
दरम्यान, पंतप्रधान मोदींच्या तीन देशांच्या दौर्यात व्यापार, गुंतवणूक, सामरिक सहकार्य, इंडो-पॅसिफिक क्षेत्रातील भागीदारी आणि विविध द्विपक्षीय मुद्द्यांवर प्रमुख चर्चा होण्याची शक्यता आहे. वस्तू आणि सेवांच्या व्यापाराला चालना देणे, गुंतवणुकीला प्रोत्साहन देणे आणि दोन्ही देशांमधील आर्थिक संबंध अधिक दृढ करणे या उद्देशाने भारत आणि न्यूझीलंडने या वर्षाच्या सुरुवातीला एका मुक्त व्यापार करारावर स्वाक्षरी केली.