दुष्काळी परिस्थितीमध्ये तलावांमधील गाळ उपशाचे काम प्राधान्याने करा

Foto
मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे यांचे निर्देश
छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो) दुष्काळी स्थितीत विभागातील तलावांमधील गाळ काढण्याचे काम केल्यास तलावांची पातळी वाढून मत्स्योत्पादन वाढेल. त्यामुळे तलावांमधील गाळ काढण्याची कामे प्राधान्याने पूर्ण करावीत, असे निर्देश राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी दिले.
दुष्काळी पार्श्वभूमीवर कन्नड तालुक्यातील शिवणाटाकळी येथील तलावाची पाहणी करून मच्छीमार बांधवांशी संवाद साधला. त्यानंतर त्यांना जालना जिल्ह्यातील तलावांची पाहणी केली व तेथील मच्छिमार बांधवांशी संवाद साधला. त्यानंतर राणे
यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठकीत आढावा घेतला. बैठकीस मत्स्य आयुक्त भानुदास पालवे, सहआयुक्त (भूजल) ऋता दीक्षित,
प्रादेशिक आयुक्त सुरेश भारती, सहाय्यक आयुक्त माधुरिमा जाधव, जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक प्रेषित मोघे, जलसंपदा व
जलसंधारण विभागांचे अधिकारी तसेच बीड, जालना, परभणी, छत्रपती संभाजीनगर येथील अधिकारी उपस्थित होते.
१९ हजार टन मत्स्योत्पादन क्षमता
बैठकीत माहिती देण्यात आली की, विभागातील ३७ तालुक्यांमध्ये ३८६ पाटबंधारे तलाव आहेत. ३८९ मत्स्यव्यवसाय सहकारी संस्था कार्यरत असून त्याचे १५२७६ सभासद आहेत. एकूण जलक्षेत्र ४७हजार ४७ हेक्टर इतके असून ७४३.६४ लाख मत्स्यबीज संचयन क्षमता आहे. १९ हजार ४३२ मे.टन मत्स्योत्पादन क्षमता आहे. विभागात ४ शासकीय मत्स्यबीज केंद्र आहेत. अवर्षण स्थितीमुळे १०६ तलाव कोरडे आहेत. १११ तलावांमध्ये १० टक्के पेक्षा कमी तर १६९ तलावांमध्ये १० टक्क्यांपेक्षा जास्त जलसाठा आहे.
उपपदार्थांना बाजारपेठ
दुष्काळी पार्श्वभुमिवर मच्छिमार बांधवांचे होणाऱ्या नुकसानीचे मोजमाप व पंचनामे करून नियमानुसार योग्य ती मदत मिळवून देण्यात येईल, असे नितेश राणे यांनी उपस्थित मच्छिमार बांधवांना आश्वस्त केले. तसेच राज्यात राबविण्यात येत असलेल्या मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजनेचा मच्छीमार बांधवांनी मोठ्या प्रमाणात लाभघ्यावा, असे आवाहन केले. पात्र लाभाथ्यर्थ्यांनी योजनेचा लाभघेण्यासाठी प्रस्ताव सादर करावेत. महिला मच्छीमार बचत गटांच्या माध्यमातून तयार होणाऱ्या मत्स्यजन्य उपपदार्थांना योग्य बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक सहकार्य करण्याचे आश्वासनही राणे यांनी यावेळी दिले.
https://epaper.sanjwarta.in/Powered By: Vrudhee Solutions