पैठणच्या खुल्या कारागृहातून पळालेल्या कैद्याला बार्शीतून अटक

Foto
पैठण, (प्रतिनिधी): पैठण खुल्या कारागृहातून पळून गेलेल्या एका कैद्याला पैठण पोलिसांच्या विशेष पथकाने बार्शी (जि. सोलापूर) येथून जेरबंद करण्यात यश मिळवले आहे. पांडुरंग उर्फ वेडा कल्याण काकडे असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. या कारवाईमुळे कारागृह प्रशासनाने सुटकेचा निःश्वास सोडला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी पांडुरंग काकडे हा पैठण येथील खुल्या कारागृहात शिक्षा भोगत होता. मात्र, २५ जानेवारी २०२६ रोजी त्याने कारागृहाच्या कायदेशीर रखवालीतून पलायन केले होते. याप्रकरणी पैठण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. आरोपीच्या अटकेसाठी पोलिसांकडून सातत्याने शोध घेतला जात होता. गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांना आरोपी बार्शी भागात लपल्याची खबर मिळाली.

 त्यानुसार, पथकाने सापळा रचून आरोपी पांडुरंग काकडे यास बार्शीतून शिताफीने अटक केली. त्याला न्यायालयात हजर करण्यात आले. ही यशस्वी कारवाई छत्रपती संभाजीनगर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक प्रकाश जाधव, अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत स्वामी आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. यामध्ये पैठण पोलीस निरीक्षक महादेव गोमारे, पोलीस उपनिरीक्षक शेख, हेड कॉन्स्टेबल मोकळे, बल्लाळ यांच्या पथकाने महत्त्वाची भूमिका बजावली.