पुरवठा निरीक्षकांच्या मनमानीमुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी
गंगापूर, (प्रतिनिधी) : तालुक्यातील शिधापत्रिका ऑनलाईन करण्याच्या प्रक्रियेत मोठ्या प्रमाणात अनियमितता दिसून येत आहे. तालुक्यातील एका गावातील लोकप्रतिनिधींच्या जवळच्या व्यक्तींनी सुमारे मोठ्या संख्येने शिधापत्रिका ऑनलाईन करण्यासाठी घेतल्या असून, सर्वसामान्य नागरिकांचे अर्ज मात्र अद्याप प्रलंबित आहेत. त्यामुळे नागरिकांना तहसील कार्यालयाच्या पुरवठा विभागात वारंवार चक्कर मारावी लागत आहे.
तहसील कार्यालयातील पुरवठा निरीक्षकांचा मनमानी कारभार आणि राजकीय दबावामुळे काही निवडक लोकांचे काम तत्काळ पूर्ण केले जात असल्याचा गंभीर आरोप नागरिकांकडून करण्यात आला आहे. सर्वसामान्य नागरिकांची कामे मात्र दिवसेंदिवस थांबवून ठेवण्यात येत असल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. ऑनलाईन प्रक्रियेदरम्यान सर्व्हर बंद, नेटवर्क समस्या, आवश्यक कागदपत्रे अपलोड न होणे, यामुळे नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. पारदर्शकतेच्या नावाखाली सुरू असलेली ही प्रक्रिया प्रत्यक्षात त्रासदायक ठरत असल्याची भावना सर्वसामान्यांमध्ये व्यक्त होत आहे.
सर्वसामान्य नागरिकांमध्ये तीव्र नाराजी :
तहसील कार्यालयातील शिधापत्रिका ऑनलाईन प्रक्रियेत खाजगी व्यक्तीकडून मनमानीपणे काम चालवले जात असल्याचे प्रकार समोर आले असून, त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. अनेकांना अवैध व्यवहार व पैशाची मागणी सहन करावी लागत आहे.
काही नागरिकांनी असा आरोप केला की, सरकारी कामाचे नाव देऊन काही जण वैयक्तिक फायदा घेत आहेत. अधिकारी बसून असतात, पण काम बाहेरील माणसे करतात. सरकारी कार्यालयात अधिकृत कर्मचाऱ्यांऐवजी बाहेरील व्यक्ती नागरिकांचे अर्ज तपासणे, कागदपत्रे मागविणे आणि ऑनलाईन प्रक्रिया करणे या कामांत सहभागी असल्याचे नागरिकांनी सांगितले आहे.
शिधापत्रिका ऑनलाईन प्रक्रियेमुळे सामान्य नागरिकांचे अक्षरशः हाल होत आहेत. सर्व्हर डाऊन आणि नेटवर्क समस्या यामुळे काम सुरळीत होत नाही.
रशीद पटेल, सामाजिक कार्यकर्ता.
आम्ही सकाळपासून सायंकाळपर्यंत रांगेत उभे राहतो, पण काम होत नाही. ज्यांच्याकडे ओळख आहे. त्यांचे काम पटकन होते, बाकी लोकांना दिवसेंदिवस फिरावे लागते.
सूर्यकांत पाटील, तालुकाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)
घरकाम करून वेळ काढून कार्यालयात जातो, पण प्रत्येक वेळेस वेगवेगळे कागद मागितले जातात. प्रशासनाने नागरिकांचा वेळ आणि श्रम वाचवावेत.
- कावेरी पाटील, समाजसेवक.