काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी वड्रा यांच्या मिशन यूपीला आजपासून लखनऊनमधून सुरुवात होणार आहे. त्यांच्याकडे पूर्व उत्तर प्रदेशची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. उत्तर प्रदेशातील काँग्रेस कार्यकर्त्यांनी प्रियंका गांधी यांच्या स्वागताची जय्यत तयारी केली आहे.
प्रियंका गांधी यांचा भव्य रोड शो होणार असून काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आणि पक्षाचे सरचिटणीस ज्योतिरादित्य सिंधिया त्यांच्यासोबत असणार आहेत. सिंधिया यांच्याकडे पश्चिम उत्तर प्रदेशची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. प्रियंका गांधी यांच्या दौर्याआधी त्यांचा एक ऑडिओ संदेश समोर आला आहे. त्यामध्ये त्यांनी युवक, महिला आणि समाजाच्या दुर्बल वर्गाला नवीन भविष्य घडवण्यासाठी सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. आपण सर्व मिळून राजकारणात नवीन सुरुवात करु असे प्रियंका गांधी यांनी म्हटले आहे. लखनऊमध्ये काही पोस्टर्सवर प्रियंका गांधी यांना देवीच्या रुपात दाखवण्यात आले आहे तर काँग्रेस कार्यकर्त्यांनी त्यांचा फोटो असलेले टी-शर्ट परिधान केले आहेत.