छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो) : महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाने उन्हाळी सत्रातील पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या लेखी परीक्षांचे सुधारित संभाव्य वेळापत्रक जाहीर केले आहे. पाच टप्प्यांतील परीक्षांचे नियोजन परीक्षा नियंत्रक डॉ. संदीप कडू यांनी परिपत्रकाद्वारे संलग्न महाविद्यालयांना कळवले आहे.
सुधारित परिपत्रकानुसार पहिल्या टप्प्यात पदव्युत्तर वैद्यकीय (एमडी, एमसएस, डीएम, एमसीएच आदी), आयुर्वेद, युनानी, दंतचिकित्सा, होमिओपॅथी तसेच पीजी ऑक्युपेशन थेरपी, फिजिओथेरपी आदी अभ्यासक्रमांच्या परीक्षा ९ मेपासून सुरू होणार आहेत. दुसर्या टप्प्यात पदवी अभ्यासक्रमांच्या परीक्षा २७ जूनपासून होतील. यात दंतचिकित्सा, आयुर्वेद, युनानी, होमिओपॅथी, फिजिओथेरपी, ऑक्युपेशनल थेरपी, परिचारिका अभ्यासक्रम तसेच, भाषण व श्रवण विज्ञान, कृत्रिम अवयव तंत्रज्ञान आदी अभ्यासक्रमांचा समावेश आहे. याच टप्प्यात सार्वजनिक आरोग्य, व्यवस्थापन, दृष्टी विज्ञान, वैद्यकीय प्रयोगशाळा तंत्रज्ञान यांसारख्या विद्यापीठ अभ्यासक्रमांच्याही परीक्षा घेतल्या जाणार आहेत.














