सिल्लोड, (प्रतिनिधी) : एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत सिल्लोड तालुक्यातील (प्रकल्प- २) सिल्लोड ग्रामीण अंतर्गत असलेल्या लोणवाडी या महसूली गावातील १ अंगणवाडी सेविका तसेच अनवी आणि अंधारी येथे प्रत्येकी १ रिक्त असलेल्या मदतनीस पदांसाठी पदभरतीची कार्यवाही २० जुलै पासून सुरू करण्यात येत आहे.
सदरील भरती प्रक्रिया ही राज्य शासनाच्या शासन निर्णय २ फेब्रुवारी २०२३ व दिनांक ३० जानेवारी २०२५ मधील नमूद अटी व शर्तीनुसार करण्यात येणार आहे. अंगणवाडी सेविका व मदतनीस पदासाठी शैक्षणिक पात्रता किमान १२ वी परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. १२ वी पेक्षा जास्त शिक्षण पुर्ण केलेल्या अर्जदारास शासन निर्णय दिनांक ३० जानेवारी २०२५ मध्ये नमूद परिशिष्ट अ नुसार अतिरिक्त गुण देण्यात येईल अतिरिक्त गुण
मिळविण्यासाठी अर्जदाराने पदवी, पदव्युत्तर पदवी, डी. एड., बी. एड. एम. एस. सी. आय. टी. अथवा शासनाने ठरविलेल्या समकक्ष संगणक परीक्षा प्रमाणपत्र उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
विधवा अथवा अनाथ, मागास प्रवर्गातील, सेविका, मिनी सेविका, मदतनीस पदाचे किमान २ वर्ष अनुभव असणाऱ्या अर्जदाराला अतिरिक्त गुण देण्यात येईल. प्रकल्प कार्यालयाकडून पदभरती बाबत जाहिरात संबंधित महसूली गावाच्या ग्राम पंचायत कार्यालय, अंगणवाडी केंद्र, प्रकल्प कार्यालयाच्या नोटीस बोर्डावर १७ जुलै रोजी प्रसिद्ध करून अर्ज स्विकारण्याचा कालावधी २० जुलै ते ३१ जुलै पर्यंत कार्यालयीन कामाचे एकूण १० दिवस (शासकीय सुटीचे दिवस वगळून) निश्चित केली आहे.
तरी पद भरती असलेल्या महसुली गावातील पात्र महिला, मुलींनी अर्ज रितसर अर्ज सादर करावे असे आवाहन केले आहे.
सदरील पदभरतीसाठी विहित अर्जाचा नमुना महसूली गावातील अंगणवाडी सेविका, एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प २ सिल्लोड कार्यालय येथे उपलब्ध असून अर्जदाराने परिपूर्ण भरलेला अर्ज एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प - २ सिल्लोड कार्यालय, पंचायत समिती गेट जवळ पंचायत समिती आवार सिल्लोड येथे स्वतः उपस्थित राहून कार्यालयीन वेळेत सादर करावा.
पोस्टाने इतर व्यक्तीच्या हस्ते अथवा इतर कोणत्याही मार्गाने अर्ज स्वीकारले जाणार नाही अशी माहिती बाल विकास प्रकल्प अधिकारी शिवाजी वने तसेच कनिष्ठ सहायक प्रतीक जोशी यांनी दिली.