औरंगाबाद – आंबेडकरी चळवळीतील नेते, साहित्यिक आणि विचारवंत तथा राज्य सरकारच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर चरित्र साधने प्रकाशन समितीचे सदस्य सचिव प्रा. अविनाश डोळस यांचे रविवारी सकाळी ६ वाजता ह्रदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. ते ६७ वर्षांचे होते.
प्रा. अविनाश डोळस हे डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेल्या मिलिंद
महाविद्यालयात मराठी विभाग प्रमुख होते. तसेच अड. प्रकाश आंबेडकरांच्या नेतृत्वातील
भारिप बहुजन महासंघाचे ते नेते होते. विद्यार्थी दशेपासून आंबेडकरी चळवळीत सक्रिय
राहिलेले प्रा. डोळस हे नामांतर आंदोलन आणि मराठवाडा युवक चळवळीत सक्रिय होते. त्यांची
लेखनी ही कायम दलित, बहुजनांवर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध चालवली होती. महासंगर हा
त्यांचा कथा संग्रह प्रसिद्ध आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर चरित्र साधने प्रकाशन समितीच्या सदस्य सचिवपदी निवड
झाल्यानंतर प्रा. डोळस यांनी बाबासाहेबांचे साहित्य मराठीमध्ये भाषांतरित करण्याला
प्राधान्य दिले होते. २०१५ मध्ये ‘Annihilation
of Cast’ चे मराठी भाषांतर ‘जातिव्यवस्थेचे निर्मूलन’ हे पुस्तक प्रकाशित केले
होते. बाबासाहेबांचे इतरही इंग्रजी साहित्य सर्वसामान्यांपर्यंत मराठीत पोहोचावे
यासाठी प्रा. डोळस यांचे प्रयत्न सुरु होते.
नाट्य संमेलनाचे अध्यक्ष
दलित, कष्टकरी, बहुजनांसाठी लेखनी चालवणारे प्रा. अविनाश डोळस हे प्रसिद्ध
नाट्यलेखक होते. जानेवारी १९९० मध्ये नांदेड येथे झालेल्या पाचव्या अखिल भारतीय
दलित नाट्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते.
जानेवारी २०११ मध्ये चंद्रपूर येथील घुग्घुस येथे भरलेल्या १२व्या आंबेडकरी
साहित्य संमेलनाचेही ते अध्यक्ष होते.
प्रकाशित साहित्य
महासंगर (कथासंग्रह)
सम्यक दृष्टीतून...
आंबेडकरी चळवळ : परिवर्तनाचे संदर्भ
ही त्यांची ग्रंथसंपदा प्रकाशित आहे.
सायंकाळी ४ वाजता अंत्यविधी
प्रा. डोळस यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी नंदनवन कॉलनी येथील त्यांच्या निवासस्थानी
ठेवण्यात आले आहे. सायंकाळी ४ वाजता भीमनगर भावसिंगपूर येथील स्मशानभूमीत
त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहेत.













