औरंगाबाद – शहराचे प्रथम नागरिक महापौर नंदकुमार घोडेले यांनी मालमत्ता कर वसुलीकरुन मनपाची तिजोरी भरण्याचा जणू विडा उचलला आहे. सलग चार दिवसांपासून महापौरांची करवसुलीसाठी घौडदौड सुरु आहे. यासाठी त्यांनी कर वसुली पथकासोबत आता ढोल ताशा आणि लेझीम पथकही सोबत घेतले आहे. मालमत्ता कर थकबाकीदारांच्या घर-दुकानांसमोर ढोल ताशांचा गजर करत कर वसुली केली जात आहे.
शहराच्या विकासासाठी आवश्यक असणारा निधी पालिकेच्या
उत्पन्नातून उभा करायचा असतो. मात्र मनपाच्या तिजोरीत खडखडाट असल्यामुळे दिवाळी
संपल्याबरोबर महापौर घोडेले यांनी मालमत्ता कर वसुलीवर लक्ष केंद्रीत केले आहे.
थकबाकीदारांच्या दारात ढोल-ताशाचा गजर करुन महापौर स्वतः जातीने उपस्थित राहून कर
वसुली करत असल्याचे चित्र सध्या शहरात पाहायला मिळत आहे. महापौरांनी स्वतः कर
वसुलीसाठी जावे का, असा सवालही राजकीय वर्तुळात उपस्थित होत आहे.
ढोल ताशा आणि लेझीम पथकासह कर वसुली
महापालिकेचे प्रशासकीय सैन्य बरोबर घेऊन महापौर दारोदार वाजत गाजत "घोडदौड" करत आहेत. महापौरांच्या या संगीतमय कर वसुली कारवाईमुळे थकबाकीदारांचा धाबे दणाणले आहे. थकबाकीदारांच्या दारात जाऊन पथक ढोलताशाचा गजर करत आहे. या पथकात काही मुली असून त्या लेझीमही खेळत आहेत. महापौर नंदकुमार घोडेले यांनी सुरु केलेल्या या अनोख्या कारवाईमुळे शहरवासियांचे लक्ष वेधून घेण्यात ते यशस्वी होत असल्याचे चित्र आहे. यासंदर्भात त्यांना विचारले असता ते म्हणाले, ‘महापालिकेचा मालमत्ता कर भरण्यासाठी नागरिकही प्रतिसाद देत आहेत. त्यामुळेच दोन दिवसांत कोट्यवधींची वसुली झाली आहे.’












