दोन महिन्यांत १११ कोटी मनपा वसुल करणार का ?

Foto
मालमत्ता कर वसुली शंभर कोटींवर
औरंगाबाद : यंदा मालमत्ता कर वसुली करिता मनपा प्रशासनाने २११ कोटी रुपयांचे उद्दिष्ट ठेवले आहे. आजवर सुमारे शंभर कोटींचा मालमत्ता कर वसूल करण्यात आला आहे.  आर्थिक वर्ष संपायला केवळ दीड महिन्यांचा कालावधी शिल्लक आहे. यामुळे या दीड महिन्यात तब्बल १११ कोटी रुपये वसूल करण्याचे आव्हान मनपा प्रशासनासमोर आहे. 

एकीकडे मनपाच्या तिजोरीत खडखडाट आहे. दुसरीकडे शहरातील मालमत्ता धारकांकडे मनपाची कोट्यवधींची थकबाकी आहे. यामुळे यंदा मनपा प्रशासनाने २११ कोटी ६३ लाख रुपये मालमत्ता कर वसुलीचे उद्दिष्ट समोर ठेवले. त्यादृष्टीने प्रयत्न मात्र झाले नाही. अस्तिक कुमार पांडेय रुजू झाल्यानंतर मात्र या कर वसुलीला गती मिळाली. आजवर १०० कोटी २८ लाख ६९ हजार ३८० रुपयांची मालमत्ता कर वसुली  करण्यात आली. मात्र उद्दिष्टाचा विचार केल्यास कर वसुली केवळ ५० टक्‍क्‍यांपर्यंतच गेली असल्याचे दिसून येते. आता आर्थिक वर्ष संपण्या करिता केवळ दीड महिन्यांचा कालावधी शिल्लक आहे. या कालावधीतच प्रशासनाला उर्वरित सुमारे ५० टक्के म्हणजे १११ कोटी रुपये वसूल करण्याचे आव्हान प्रशासनासमोर आहे. या दृष्टीने प्रशासनाला तयारी करावी लागणार आहे. उद्दिष्टाची ५० टक्के रक्कम वसूल करण्यातच प्रशासनाला सुमारे दहा महिने १५ दिवस लागले. आता एवढीच रक्कम दीड महिन्यात प्रशासन कसे वसूल करेल, त्यात त्यांना यश येईल काय? हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.