समृद्धी लूट कांडाचा तपास वेगात; संशयित ताब्यात

Foto
फॉर्च्यूनर अडवून सोन्याची साखळी लुटल्याप्रकरणी पोलिसांची कारवाई; साथीदारांचा शोध सुरू

 वैजापूर, (प्रतिनिधी) : समृद्धी महामार्गावर दिवसाढवळ्या फॉर्च्यूनर कार अडवून तरुणाच्या गळ्यातील सोन्याची साखळी लुटल्याच्या घटनेने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या प्रकरणाची नोंद होताच वैजापूर पोलिसांनी तपासासाठी स्वतंत्र पथके स्थापन केली. स्थानिक गुन्हे शाखेनेही या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन स्वतंत्र पथक तपासात उतरवले.

घटनेनंतर दोन दिवसांनी, शुक्रवारी रात्री पोलिसांच्या हाती एक संशयित आरोपी लागल्याने तपासाला मोठी चालना मिळाली आहे. पोलिसांनी एका आरोपीला ताब्यात घेतल्याची पुष्टी केली असली, तरी तपास सुरू असल्याने इतर माहिती देण्यास पोलिसांनी नकार दिला आहे.

-- मंदिरातील गुंडांचा तस्करांशी संबंध? -- 
ताब्यात घेतलेल्या आरोपीविरुद्ध यापूर्वीही गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली आहे. त्याच्या आठ ते नऊ साथीदारांचा गट समृद्धी महामार्गावर सक्रिय असल्याचा पोलिसांना संशय आहे. हे आरोपी केवळ गुन्हेगारी कृत्यांमध्येच सहभागी नसून, बीड जिल्ह्यातील मोठ्या गुन्हेगारी टोळीशी त्यांचे संबंध असल्याची शक्यताही तपासली जात आहे.

-- विविध ठिकाणी पोलिसांची चौकशी : -- 
पोलिसांची पथके कोपरगाव, येवला, शिर्डी, जालना, बीड आणि छत्रपती संभाजीनगरसह विविध ठिकाणी सातत्याने तपास करत आहेत. दोन दिवसांच्या अथक प्रयत्नांनंतरही पोलिसांच्या हाती ठोस पुरावा लागत नव्हता. मात्र, संशयित वाहनांची माहिती, संभाव्य मार्ग आणि उपलब्ध तांत्रिक पुराव्यांच्या आधारे तपास पुढे नेण्यात आला.

-- फॉर्च्यूनर कार अडवून लूट -- 
मिळालेल्या माहितीनुसार, २६ ऑगस्ट रोजी दुपारी समृद्धी महामार्गावर वैजापूर तहसीलमधील एक्झिट क्रमांक १८ जवळ अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यातील उद्योजक सतीश सोनवणे यांच्या फॉर्च्यूनर कारला तीन वाहनांमधून आलेल्या सुमारे आठ जणांनी अडवले होते. यानंतर वाहनचालकासोबत मारहाण करून त्याच्या गळ्यातील दीड लाख रुपये किंमतीची सोन्याची साखळी लुटण्यात आली. या घटनेनंतर पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली. दरम्यान, समृद्धी महामार्गावरील घटनेच्या ठिकाणी तसेच संशयितांच्या हालचालींच्या मार्गावरील सीसीटीव्ही फुटेजची पोलिसांनी तपासणी केली. याच तपासातून संशयित आरोपीपर्यंत पोहोचण्यास पोलिसांना यश आले.

-- आरोपींच्या साथीदारांचा शोध सुरू -- 
ताब्यात घेतलेल्या संशयित आरोपीची वैजापूर पोलिसांकडून कसून चौकशी सुरू आहे. चौकशीदरम्यान त्याच्या साथीदारांबाबत, गुन्ह्यात वापरण्यात आलेल्या वाहनांबाबत तसेच लुटलेल्या सोन्याच्या साखळीबाबत महत्त्वाची माहिती मिळण्याची शक्यता आहे. पोलिसांच्या तपासानंतरच ताब्यात घेण्यात आलेला संशयित या लूटकांडात प्रत्यक्ष सहभागी होता की नाही, हे स्पष्ट होणार आहे. त्यामुळे तपासाच्या पुढील टप्प्यात आणखी आरोपी निष्पन्न होण्याची शक्यता आहे.