गंगापूर, (प्रतिनिधी): वंचित बहुजन आघाडीच्यावतीने सोमवारी (दि.६) नरेंदर कब मिलेगा सिलिंडर आंदोलनाच्या माध्यमातून विविध मागण्यांकडे प्रशासनाकडे लक्ष वेधण्यासाठी तहसिल कार्यालयात ठिय्या आंदोलन करण्यात आले. यावेळी तहसीलदार नवनाथ वागवाड यांना निवेदन दिले.
गॅस टंचाई आणि दैनंदिन जीवन, रोजीरोटी, रोजगारावर झालेल्या परिणामाबद्दल सरकारचे लक्ष वेधण्यासाठी हे वंचित बहुजन आघडीच्यावतीने राज्यभर आंदोलन पुकारण्यात आले होते. काही दिवसांपूर्वी अकोला येथे वंचित बहुजन आघाडीचे माजी सरपंच शंकरराव शिरसाठ हे गॅस सिलिंडर मिळवण्यासाठी पाच तास उन्हात रांगेत उभे होते. त्यावेळी त्यांचा मृत्यू झाला होता.
अमरावती येथेही एका तरुणाचा मृत्यू झाला होता. गॅसच्या तुटवड्यामुळे स्वयंपाक घरातील गॅस शेगड्या थंड पडल्या आहेत, चहाची टपरी, रस्त्यावरील खाद्य पदार्थांचे स्टॉल्स बंद झाले आहेत. जगण्यासाठी अनेकांना कोळसा आणि लाकडाच्या चुलीवर स्वंयपाक करून जगावे लागत आहे. छोटे व्यावसायिकांनी आपले दुकान बंद केल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे.
तसेच लग्न समारंभ, घरगुती धार्मिक कार्यक्रम, केटरिंगची कामे गॅस टंचाईमुळे पुढे ढकलण्यात आली आहे. के. वाय.सी. नाही म्हणून नागरीकांना गॅस सिलिंडर दिला जात नाही नागरीकांना तातडीने गॅस उपलब्ध करून द्यावा. जिल्हाधिकारी यांनी उज्वला गॅस योजने अंतर्गत किती लोकांना गॅस सिलिंडर दिल्याचे ऑडिट करावे अशी मागणी निवेदनाव्दारे केली आहे. यावेळी जितेंद्र शिरसाठ, रामनाथ शिराळे, अशोक खिल्लारे, अमृतराव डोंगरदिवे, संदीप जाधव, सीमा भंडारे, ताराबाई जाधव, अरुण ससाने, भास्कर खंडागळे, नंदकुमार गाडेकर, दिलीप आरक, सुमनबाई बनकर, अण्णासाहेब सोनवणे, विलास दांडगे, प्रकाश ससाने, लताबाई खिल्लारे यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.













