आंदोलनकर्त्यांनी पंचायत समिती कार्यालयात सोडली गाढवे

Foto
वैजापूर, (प्रतिनिधी) महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी कामांच्या बाबत असलेल्या विविध मागण्यांसाठी मागील २० दिवसांपासून येथील पंचायत समिती कार्यालयासमोर उपोषण सुरू आहे. 

दररोज वेगवेगळे आंदोलन करून प्रशासनाचे लक्ष वेधण्यात येते. सोमवारी आंदोलनकर्त्यांनी चक्क कार्यालयात गाढवे सोडली. महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी या योजनेअंतर्गत कार्यारंभआदेशानुसार कामे पूर्ण करून द्यावीत, मंजूर कामाची ई-ट्रेनिंग केलेल्या अहवालाची प्रमाणित नक्कल द्यावी, प्रत्येक कामाची प्रत्यक्ष पाहणी करा, २०२० पासून योजनेच्या कामाचा प्रगती अहवाल द्या, या कामावर किती रक्कम खर्च करण्यात आली याची माहिती मिळावी.

मंजूर कामे त्वरित सुरू करावी. नवीन कामांना मंजुरी देण्यात यावी, आदी मागण्या केल्या आहेत. घंटानाद, प्रशासनाचा पुतळा दहन, भारूड, भीक मांगो आंदोलन, पोतराज असे उपक्रम राबवून प्रशासनाचे लक्ष आंदोलनकर्त्यांचे
लक्ष वेधले.

सोमवारी आठवडी बाजाराचा दिवस असूनही, मिटिंगचेनिमित्त सांगून अधिकारी व कर्मचारी हजर नव्हते. त्यामुळे नागरिक कार्यालयात ताटकळत बसले होते. पंचायत समिती कार्यालयात गाढवे सोडून आंदोलनकर्त्यांनी निषेध केला. 

यावेळी अजय साळुंके, रियाज खान पठाण, निवृत्ती सोनवणे, साबेर पठाण, कैलास बागूल, नामदेव पठाडे, शेख मौजम, भागवत पठारे आदींची उपस्थिती होती.