रांचीमध्ये आंदोलक विद्यार्थ्यांचे आंदोलन पेटले ! लाठीचार्ज अन् पाण्याचा मारा... विधानसभेला घेराव घालताना मोठा राडा...

Foto
रांची : झारखंडची राजधानी रांची येथे JPSC-JSSC परीक्षेतील कथीत अनियमिततेच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू आहे. आज या विद्यार्थ्यांनी बॅरिकेड्स तोडून विधानसभेला घेराव घालण्यासाठी विधानभवनाकडे कुच करण्याचा प्रयत्न केला. दरम्यान  पोलीस आणि आंदोलकांमध्ये संघर्ष उफाळून आला. विद्यार्थ्यांनी पुढे सरकण्याचा आणि बॅरिकेड्स ओलांडण्याचा प्रयत्न केल्यानंतर, पोलिसांनी त्यांच्यावर पाण्याचा मारा आणि लाठीचार्ज केला. यानंतर, आंदोलक विद्यार्थ्यांनीही पोलिसांवर चपला आणि बूट फेकायला सुरुवात केली. 

या घटनेनंतर आंदोलनस्थळी तणाव वाढला आहे. पोलीस जमावाला पांगवण्याचा प्रयत्न करत आहेत. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी सुरक्षा व्यवस्था कडक केली आहे. 

रांची पोलीस प्रमुखांनी सांगितलं, का करावा लागला लाठीचार्ज? -
या कारवाईसंदर्भात बोलताना राँचीचे पोलीस प्रमुख पारस राणा म्हणाले, "पोलिसांनी वारंवार समज देऊनही आंदोलक ऐकण्यास तयार नव्हते. ते बैरिकेड्स तोडून पुढे जाण्याचा प्रयत्न करत होते. यामुळे कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी आणि परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला." तसेच, "पोलीस विद्यार्थ्यांच्या विरोधात नसून प्रशासन त्यांच्या मागण्यांबाबत संवेदनशील आहे," असेही त्यांनी सांगितले.

विद्यार्थांचा पोलिसांवर अमानुष कारवाईचा आरोप... -
दुसऱ्या बाजूला आंदोलक विद्यार्थ्यांनी पोलिसांवर अमानुष कारवाईचा आरोप केला आहे. नियमानुसार लाठीचा वापर कमरेच्या खाली करायचा असतो. पण, पोलिसांनी विद्यार्थ्यांचे डोके, हात आणि चेहऱ्यावर लाठ्या मारल्याचा दावा विद्यार्थ्यांनी केला आहे. या कारवाईमुळे विद्यार्थ्यांमध्ये राज्य सरकार आणि पोलिसांविरुद्ध तीव्र संताप व्यक्त करत आहेत.