नागपूर: राजकारण हा माझ्यासाठी व्यवसाय नसून सामाजिक-आर्थिक परिवर्तनाचे माध्यम असलेले मिशन आहे, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. १९९२ च्या अयोध्या रामजन्मभूमी आंदोलनात मी २० वर्षांचा असतो सहभागी झालो. या आंदोलनादरम्यान गोळीबाराचा सामना करावा लागला आणि बदायू कारागृहात १८ दिवस राहावे लागले. बाबरीचा ढाचा पाडला तेव्हा आपण तेथे उपस्थित होतो आणि त्याचा मला गर्व आहे असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. जनमंथनतर्फे महिनाभरापासून सुरू असलेल्या ‘मंथन ४ युवा नागपूर २०२६’ अभियानाच्या समारोपप्रसंगी रेशीमबाग मैदानावर युवकांशी संवाद साधताना फडणवीस बोलत होते.
या कार्यक्रमाला क्रिकेटपटू तिलक वर्मा, अर्जुन पुरस्कार विजेती बुद्धिबळपटू दिव्या देशमुख, ॲथलेटिक्स पदकविजेता दिलीप गावीत, जेनेरिक आधारचे संस्थापक अर्जुन देशपांडे, गो झीरोचे संस्थापक किरण शहा, क्रिकेट समालोचिका रिद्धीमा पाठक प्रामुख्याने उपस्थित होते. युवकांच्या वाढत्या स्क्रीनटाइमवरही फडणवीस यांनी भाष्य केले. मुलांचा स्क्रीनटाइम कमी करावा लागेल. मुले मैदानावर दिसली पाहिजेत. स्क्रीनवर राहणे पूर्णपणे चुकीचे नाही; डिजिटल आणि ऑरेंज इकॉनॉमीमध्ये मोठ्या संधी आहेत. मात्र, त्यासाठी जीवनात संतुलन आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
इन्क्युबेशन सेंटरच्या विकेंद्रीकरणावर भर
मोठ्या शहरांपुरती मर्यादित असलेली स्टार्टअपची संधी आता ‘टीअर-३’ शहरांतील तरुणांपर्यंत पोहोचविण्यासाठी सरकारने पुढाकार घेतला आहे. मोठ्या इन्क्युबेशन सेंटरचे विकेंद्रीकरण करण्यावर सरकारचा भर आहे. तरुणांना सुलभ प्रणाली मिळाल्याशिवाय राज्यातील स्टार्टअप इकोसिस्टम मोठी होऊ शकत नाही. त्यामुळे स्टार्टअप सुरू करणाऱ्या तरुणांशी सरकार थेट संवाद साधून त्यांच्या अडचणी दूर करेल, असे प्रतिपादन फडणवीस यांनी केले.
अपेक्षांचे ओझे असते, संयम महत्त्वाचा: वर्मा
भारतीय क्रिकेटपटू तिलक वर्मा यांनी यशामागील संघर्ष आणि दबावाचा अनुभव युवकांसोबत शेअर केला. पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात खेळताना हृदयाची धडधड वाढली होती; मात्र त्या तणावाचा फटका देशाला बसू नये, हाच विचार मनात होता. मैदानावर दिसणाऱ्या धावा आणि संधींच्या मागे मोठा संघर्ष असतो यशानंतर अपेक्षांचे ओझे वाढते. सातत्य राखणे आणि दबावाचा सामना संयमाने करणे अधिक महत्त्वाचे असल्याचे वर्मा यांनी सांगितले.
‘सिंगल विंडो’ प्रणालीची गरज
दहा पैकी नऊ स्टार्टअप बंद पडण्याची शक्यता असते. त्यामुळे सरकारचे प्रोत्साहन आणि सक्षम इकोसिस्टम आवश्यक आहे. विविध अनुपालन प्रक्रिया सोप्या करणे आणि प्रभावी ‘सिंगल विंडो क्लिअरन्स’ उपलब्ध करून देणे गरजेचे आहे, असे शहा यांनी सांगितले. तर तरुणांनी सोशल मीडियावर वेळ घालवण्यापेक्षा प्रत्यक्ष परिणाम निर्माण करणाऱ्या कामावर लक्ष केंद्रित करावा व चौकटीबाहेर विचार करावा, असे आवाहन देशपांडे यांनी केले.
हजारो ढोल-ताशांचा नाद
समारोप सोहळ्याचे प्रमुख आकर्षण ठरले ते हजारो ढोल-ताशावादकांचे सामूहिक महावादन. हजारो वादकांनी एकत्रितपणे ढोल-ताशांचा निनाद करत विक्रम प्रस्थापित केला. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते विविध स्पर्धांतील विजेत्यांना पुरस्कार प्रदान करण्यात आले.