चेन्नई : तमिळनाडू विधानसभेच्या निवडणुकीत विजय जोसेफ यांच्या टीव्हीके पक्षाने १०८ जागा जिंकत मोठा विजय संपादन केला. पण १०८ जागा जिंकल्या तरी टीव्हीके बहुमतापासून दूर आहे. त्यामुळे बहुमत सिद्ध करण्यासाठी विजय जोसेफ यांना मोठी कसरत करावी लागत आहे. तमिळनाडूच्या निवडणुकीत कोणत्याच पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालेलं नाही, त्यामुळे त्रिशंकू परिस्थिती निर्माण झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे.
टीव्हीके पक्ष सर्वात मोठा पक्ष ठरल्यामुळे विजय यांनी राज्यपालांची भेट घेऊन सत्ता स्थापनेचा दावा केला. तसेच ११३ आमदारांच्या पाठिंब्याचं पत्रही राज्यपालांकडे सादर केलं आहे. पण बहुमतासाठी ११८ हा आकडा असल्यामुळे तमिळनाडूचे राज्यपाल राजेंद्र अर्लेकर यांनी नियमावर बोट ठेवत ११८ आमदारांच्या पाठिंब्याचं पत्र घेऊन येण्यास सांगितलं. त्यामुळे विजय यांच्यासमोर मोठं आव्हान निर्माण झालं आहे.
दरम्यान, विजय जोसेफ यांनी दोनदा राज्यपालांची भेट घेऊन सत्ता स्थापनेचा दावा केला असला तरी राज्यपाल अर्लेकर यांनी ११८ आमदारांच्या पाठिंब्याशिवाय सरकार स्थापन करता येणार नाही असं स्पष्ट केलं आहे. त्यामुळे याच मुद्यांवरून विरोधकांनी त्यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे. तसेच राज्यपालांनीच विजय यांना सत्तास्थापनेपासून रोखलं असल्याची टीका राज्यपाल अर्लेकर यांच्यावर होत आहे. त्यामुळे पार्श्वभूमीवर आता राज्यपाल राजेंद्र अर्लेकर यांनी स्पष्टीकरण देत त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे.
विजय यांच्या निलांकारी या निवासस्थानी आज (७ मे) टीव्हीके पक्षाची बैठक झाली. विजय यांचा आधी शपथविधी सोहळा होईल, त्यानंतर ते बहुमत सिद्ध करतील, अशी अपेक्षा टीव्हीकेच्या आमदारांना होती. परंतु, राज्यपालांनी ठेवलेल्या अटीमुळे आमदारांच्या अपेक्षेवर पाणी फेरले गेले. राज्यपालांनी घेतलेल्या भूमिकेविरोधात उच्च न्यायालय किंवा सर्वोच्च न्यायालयात दाद मागावी, असे काही नेत्यांनी सुचवले. तर मुदतीत बहुमत सिद्ध न केल्यास पुन्हा निवडणुका होतील, अशी शक्यता बैठकीत काही नेत्यांनी व्यक्त केली. परंतु, सध्या निर्माण झालेला पेच हा कायद्याशी संबंधित नसून तो राजकीय आहे. मागील २४ तासांत टीव्हीकेच्या नेत्यांनी पाठिंबा मिळावा म्हणून डीएमकेच्या मित्रपक्षांना आवाहन केले आहे. सीपीआय, सीपीआय-एम, व्हीसीके आणि आययूएमएल या डीएमकेच्या मित्र पक्षांना टीव्हीकेने साद घातली आहे.