Maratha Reservation: खुल्या वर्गातील लोकांना आरक्षण नाही तर शैक्षणिक सुविधा द्या : प्रवीण गायकवाड

Foto
पुणे : अलीकडच्या काळात महाराष्ट्रात प्रादेशिक अस्मितांपेक्षा जातीय अस्मिता तीव्र झाल्या आहेत. मराठा समाजाच्या समस्या आरक्षणाने सुटू शकत नाहीत. जर खुल्या वर्गातील लोक आरक्षणात आले तर आरक्षणाचे  औचित्य संपून जाईल, असे मत संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष आणि मराठा नेते प्रवीण गायकवाड यांनी व्यक्त केले. मराठा, ओबीसी, एससी, एसटी या सगळ्यांनी आरक्षणावरुन एकमेकांशी भांडण्यापेक्षा एकत्र आले पाहिजे आणि महाराष्ट्र शांत ठेवला पाहिजे. महाराष्ट्र धर्म हा जपणे महत्त्वाचे आहे. त्यासाठी आम्ही पुढील काही काळात लोकांमध्ये जाऊन आमचे म्हणणे मांडणार आहोत. आमचे सर्व लक्ष्य हे महाराष्ट्र धर्मावर असेल, असे प्रवीण गायकवाड यांनी म्हटले. ते गुरुवारी पुण्यात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार  परिषदेत बोलत होते.

1 जून 2004 मध्ये खत्री कमिशनने कुणबीमध्ये 'मराठा कुणबी', 'कुणबी-मराठा' समावेशाला मान्यता दिला. त्यामुळे तांत्रिकदृष्ट्या मराठा जात ही तेव्हा ओबीसीत गेली आहे. यानंतर आम्ही राज्यभरात 'बरे झाले देवा कुणबी केलो', असे कार्यक्रम केले. त्यानंतर आम्ही सरसकट मराठा समाजाच्या आरक्षणासाठी प्रयत्न केले. त्यावेळी मी न्यायमूर्ती पी.बी. सावंत यांना मराठा समाजाला आरक्षण मिळणे शक्य आहे का, असा प्रश्न विचारला. त्यांनी म्हटले की, 'ज्या समुदायापासून संरक्षण पाहिजे तेच आता आरक्षण मागत आहेत. जर सगळ्या समाजांना आरक्षण दिलं , मग आरक्षणाचं औचित्य संपून जाईल. त्यामुळे खुल्या वर्गातील लोक आरक्षणात आले तर त्याचा उद्देशच संपून जातो', असे न्यायमूर्ती पी.बी. सावंत यांनी सांगितले. मराठा आरक्षणावर माझा स्वत:चा 25 ते 30 वर्षांचा अभ्यास आहे. शिक्षण महागल्यामुळे आणि बेरोजगारीच्या समस्येमुळे काही प्रश्न उद्भवले आहेत.
या समस्येवर फक्त आरक्षण हे उत्तर आहे, असे मला वाटत नाही, असे प्रवीण गायकवाड यांनी म्हटले. मराठा आणि ओबीसी समाज आरक्षण का मागत आहेत तर त्यांना माफक दरात शिक्षण मिळावं आणि सरकारी नोकरी मिळावी. पण आता सरकार नोकरभरती करत नाही. खासगी कंपन्यांमध्येही फारशा नोकऱ्या उरलेल्या नाहीत. ही समस्या वेगळी आहे. पण अनेकांना त्यावर आरक्षण हा शाश्वत मार्ग आहे, असे वाटते, असे प्रवीण गायकवाड यांनी म्हटले.

नेत्यांनी समाजात द्वेष पसरवू नयेत 
आमच्यासाठी महाराष्ट्र धर्म महत्त्वाचा आहे. एसटी, एससी, ओबीसी, ओपन यांनी एकत्र येऊन महाराष्ट्र शांत ठेवला पाहिजे. तसेच सध्याच्या नेत्यांनी भाषेची मर्यादा पाळली पाहिजे. नेत्यांच्या भाषेमुळे समाजात द्वेष पसरत चालला आहे. नेत्यांनी जातीय आणि धार्मिक द्वेष पसरवता कामा नये. पण अलीकडे नेत्यांच्या भाषेमुळे समाजात द्वेष पसरत चालला आहे. त्यामुळे आम्ही महाराष्ट्र धर्म टिकवण्यासाठी राज्यभरात कार्यक्रम घेणार आहोत. जेणेकरुन अस्वस्थ परिस्थिती आणि टोकदार भूमिका संपवता येतील. लोकशाहीत सर्वांना मागण्याचा हक्क आहे. सरकारने चुकीचे धोरण घेतले तर न्यायालयात दाद मागता येऊ शकते. नेत्यांनी समाजात अस्वस्थता आणि जातीय, धार्मिक, वर्गीय द्वेष पसरवू नये. महाराष्ट्र धर्म टिकला पाहिजे, असे प्रवीण गायकवाड यांनी म्हटले.

शिक्षणाचे बजेट वाढवणे हे गरजेच आहे. आरक्षणाने सर्व परिस्थिती ठीक होईल, असे नाही. सरकारने सांगितलं पाहिजे, परिस्थिती काय आहे? कोर्टात जीआर टिकतो का, हे पहावे  लागेल. सरकार एकीकडे मराठा समाजाला ओबीसी स्टेटस देते, मात्र मराठा समाजाला ओबीसीमध्ये समावेश देत नाही. सरकारने दर्जेदार शिक्षण दिले पाहिजे. सरकारने सत्य बोलावे, असेही प्रवीण गायकवाड यांनी म्हटले.