कंत्राटी कामगारांच्या वेतनासह भूमिपुत्रांना रोजगार द्या : मनसेची मागणी

Foto
पैठण, (प्रतिनिधी): पैठण - बिडकीन औद्योगिक परिसरातील कामगारांच्या प्रश्नांवर मनसे आक्रमक झाली असून मनसेच्या वतीने कामगार उपआयुक्तांकडे विविध मागण्याचे निवेदन देण्यात आले आहे. पैठण तालुक्यातील बिडकीन, चितेगाव परिसरात नव्याने विकसित होत असलेल्या औद्योगिक क्षेत्रातील कंपन्यांमध्ये कंत्राटी कामगारांची आर्थिक पिळवणूक होत असल्याचा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने करण्यात आला आहे.

भूमिपुत्रांना रोजगारात प्राधान्य द्यावे, कंत्राटी कामगारांना शासनाच्या नियमानुसार किमान वेतन द्यावे, तसेच त्यांना भविष्य निर्वाह निधी ईएसआयसी व इतर कायदेशीर सुविधा मिळाव्यात, अशा विविध मागण्यांचे निवेदन कामगार उपआयुक्त यांना देण्यात आले आहे. 

निवेदनात नमूद आहे की पैठण बिडकीन - चितेगाव औद्योगिक परिसरातील अनेक कंपन्यांमध्ये कामगारांकडून आठ
तासांपेक्षा अधिक काम करून घेतले जात असल्याच्या अनेक प्रकारे आहेत. मात्र, त्यांना नियमानुसार किमान वेतन, अतिरिक्त कामाचा मोबदला आणि इतर सुविधा दिल्या जात नसल्याचे निवेदनात म्हटले आहे. काही कामगारांना १२ तास काम करूनही अपेक्षित वेतन मिळत नसल्याचा आरोप करण्यात आला आहे.

 कंत्राटी कामगारांच्या वेतनातून पीएफ व ईएसआयसीच्या नावाखाली कपात केली जाते मात्र संबंधित रक्कम नियमितपणे जमा होते का ? याची तपासणी करण्यात यावी कामगारांना पीएफ व ईएसआयसीचा पूर्ण लाभ मिळतो की नाही, याचीही चौकशी करून नियमांचे उल्लंघन करणाऱ्या कंपन्यांवर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

बिडकीन डीएमआयसी परिसरात मोठ्या प्रमाणावर औद्योगिक विकास होत असताना स्थानिक भूमिपुत्रांना रोजगाराच्या संधी मिळण्याऐवजी बाहेरील कामगारांची भरती केली जात असल्याचा मुद्दाही उपस्थित
केला आहे. स्थानिक भूमिपुत्रांना कंपन्यांमध्ये नोकरीसाठी प्रथम प्राधान्य देण्याचे आदेश संबंधित कंपन्यांना द्यावेत, अशी मागणी मनसेने केली आहे. 

औद्योगिक परिसरात कंत्राटी कामगारांची संख्या मोठी असून, त्यांच्यासाठी स्वतंत्र ईएसआयसी रुग्णालय किंवा आरोग्य सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, जेणेकरून कामगारांना उपचारासाठी छत्रपती संभाजी नगरला जाण्याची वेळ येणार नाही, तसेच ईएसआयसी सुविधेचा लाभ घेणाऱ्या कामगारांच्या किमान वेतनाची मर्यादा २१ हजारांवरून ३० हजार रुपये करण्याबाबत शासनाकडे पाठपुरावा करावा, अशी मागणीही निवेदनात करण्यात आली आहे, 

कामगारांच्या हक्कांवर गदा येत असल्यास मनसे त्यांच्या पाठीशी ठामपणे उभी राहील. कामगारांना न्याय न मिळाल्यास त्यांच्या प्रश्नांसाठी आंदोलनाची भूमिका घ्यावी लागेल, असा इशाराही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा सचिव भगवान खाटीक यांनी दिला आहे.