शिवाजी महाराज जयंतीच्या पार्श्वभूमीवर सोयीसुविधा उपलब्ध करून द्या : नगराध्यक्ष

Foto
सिल्लोड (प्रतिनिधी) छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या पार्श्वभूमीवर शहरात आवश्यक सोयीसुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशा सूचना नगराध्यक्ष अब्दुल समीर यांनी नगर परिषदेच्या अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

छत्रपती शिवाजी महाराज जयंती च्या पार्श्वभूमीवर नगर परिषदेच्या सभागृहात विविध विभागाची आढावा बैठक नगराध्यक्ष अब्दुल समीर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यावेळी त्यांनी वरील निर्देश दिले. उपनगराध्यक्ष विठ्ठल सपकाळ, शिवसेना गटनेता सुधाकर पाटील, पाणीपुरवठा सभापती शेख इम्रान, स्वच्छता सभापती अकिल वसईकर, सार्वजनिक बांधकाम सभापती मनीषा जितेंद्र आरके, महिला व बालकल्याण सभापती वैशाली नरेंद्र पाटील, उपसभापती सुमन अशोक बन्सोड, नियोजन व विकास सभापती शेख बाबू, सदस्य शेख रउफ बागवान, राजश्री निकम, सिद्धेश्वर आहेर, शेख मोहम्मद कय्युम, रईस मुजावर, आसिफ बागवान, रेखा किशोर अग्रवाल, सत्तार हुसेन, नूर मोहंमद कुरेशी, आदी नगरसेवक तसेच मुख्याधिकारी कारभारी दिवेकर, उपमुख्याधिकारी अजगर पठाण, प्रशासकीय अधिकारी जुबेर सिद्दीकी, देवेंद्र सूर्यवंशी, स्वच्छता निरीक्षक सैबाज अली, अभियंता रितेश काळे आदी विभाग प्रमुख उपस्थित होते.

बैठकीत छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव शांततेत, शिस्तबद्ध आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडावा यासाठी विविध विभागांना जबाबदाऱ्या निश्चित करून देण्यात आल्या. शहरातील प्रमुख चौक, छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वार, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, शिवस्मारक परिसर, तसेच मिरवणुकीचे मार्ग यांची स्वच्छता विशेष मोहिमेद्वारे करण्यात यावी, कचरा त्वरित उचलण्यात यावा आणि रस्त्यांवरील खड्डे बुजवून दुरुस्तीची कामे पूर्ण करण्यात यावीत, असे निर्देश देण्यात आले.

मिरवणुकीदरम्यान नागरिकांना कोणतीही अडचण येऊ नये यासाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, प्रखर विद्युत रोषणाई, बॅरिकेड्स तसेच आवश्यक त्या ठिकाणी वाहतूक वळविण्याचे नियोजन करण्याच्या सूचना नगराध्यक्षांनी दिल्या. पोलीस प्रशासनासोबत समन्वय ठेवून पुरेसा बंदोबस्त ठेवण्यात यावा, सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची कार्यक्षमता तपासावी आणि आपत्कालीन परिस्थितीसाठी अग्निशमन व आरोग्य विभाग सतर्क ठेवावेत, असेही त्यांनी स्पष्ट केले.