छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो): शहरात सार्वजनिक शांतता आणि सुव्यवस्थेला धक्का लावणाऱ्या घटनांमध्ये वारंवार वाढ होत असल्याच्या पार्श्वभूमीवर, शहर पोलीस आयुक्तालय अॅक्शन मोडमध्ये आले आहे. रात्री उशिरापर्यंत सुरू राहणारे हॉटेल्स, बार, परमिट रूम, डीजे पार्त्या आणि मोकळ्या जागेतील संगीत कार्यक्रमांवर नियंत्रण आणण्यासाठी पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांनी नवीन नियमावली जाहीर केली आहे. या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या आस्थापनांवर थेट आणि कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा सज्जड दमही आयुक्तांनी दिला आहे.
सार्वजनिक शांतता व सुव्यवस्था राखण्याच्या उद्देशाने खालील निर्देश जारी करण्यात आले आहेत. हे मनाई आदेश पुढील ६० दिवसांसाठी म्हणजे सात जुलै ते दिनांक चार सप्टेंबरपर्यंत राहणार आहे. हे नियम मोडणाऱ्या आस्थापनाविरोधात कारवाई करण्यात येणार आहे, अशी माहिती विशेष शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अविनाश आघाव यांनी दिले.
आयुक्त प्रवीण पवार यांच्याकडून नियमावली जाहीर
असे आहेत नियम
▶▶ पब, बार, परमिट रूम्स इत्यादी आस्थापना रात्री ०९.३० वा. बंद कराव्यात. सर्व संगीत व मनोरंजनाचे कार्यक्रम रात्री साडेनऊ पूर्वी काटेकोरपणे बंद करावेत. हॉटेल व बार चालकांनी रात्री एकनंतर अन्न व मद्याच्या ऑर्डर्स घेऊ नये.
मनोरंजनात्मक कार्यक्रमासाठी परवानगी आवश्यक
▶▶ पब, हॉटेल, बार, रेस्टॉरंट, बैंक्वेट हॉल, लॉन, मोकळे मैदान व इतर ठिकाणी आयोजित संगीत कार्यक्रम, मैफल, डीजे पार्टीबाबत पोलिस आयुक्त कार्यालयाकडून परवानगी घेणे आवश्यक आहे. संगीत कार्यक्रम, डीजे इत्यादी रात्री १० वाजता बंद करणे आवश्यक आहे. ग्राहकांना बैठक रूममध्ये नाचण्याकरिता परवानगी देण्यात येऊ नये.
सीसीटिव्ही बसवा
▶ हॉल, बार, रेस्टॉरंट सह सर्व आस्थापनांनी वेळोवेळी सुधारित ध्वनिप्रदूषण (नियमन आणि नियंत्रण) नियम २००० चे काटेकोर पालन करावे तसेच सर्व आस्थापनांनी सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत. आस्थापनामध्ये दोन डीव्हीआर संच बसवावेत व ते सुरक्षित व सुस्थितीत असल्याबाबत खात्री करावी. त्यामधील रेकॉर्डिंग १५ दिवस सुरक्षित ठेवावा.
डीजे कार्यक्रमासाठी नियम
▶ व्यावसायिक कार्यक्रम किंवा बाहेरच्या कलाकारांचे कार्यक्रम आयोजित करणाऱ्या आस्थापनांनी कलाकारांचा व त्यांच्या सादरीकरणाचा संपूर्ण लेखी तपशील पोलिस आयुक्त कार्यालय, छत्रपती संभाजीनगर शहर येथे सादर करावा. जर कलाकार/परफॉर्मर्स हे परदेशी नागरिक असतील तर अशा कलाकारांचा लेखी तपशील हा १५ दिवसांपूर्वी देण्यात यावा; ज्यामध्ये पासपोर्ट कॉपी, व्हिसा तपशील, आगमनाची वेळ, प्रस्थानाची वेळ आणि निवासस्थान इत्यादी बाबत माहिती नमूद असणे अनिवार्य आहे.
https://epaper.sanjwarta.in/Powered By: Vrudhee Solutions