छत्रपती संभाजीनगर :( सांजवार्ता ब्युरो ) : सुट्टी संपल्याने पाच दिवसापूर्वी विवाह झालेल्या मुलीस भेटण्यासाठी येथे असलेल्या बीएसएफ जवानाच्या दुचाकीला भरधाव पिकअप वाहनाने धडक दिल्याने ते ठार झाले. हा अपघात औरंगाबाद - पैठण रस्त्यावरील चित्तेगाव येथे शुक्रवारी रात्री साडे दहा वाजेच्या सुमारास घडला आहे. हनुमान यशवंत लिपने ( वय 45, ऱा. वडीगोद्री, ता. अंबड, जी. जालना ) असे ठार झालेल्या जवानचे नाव आहे.
याबाबत पोलिसानी दिलेल्या माहितीनुसार, हनुमान लिपने हे त्रीपुरा येथे बॉर्डर सिक्युरिटी फोर्स येथे कार्यरत होते. ते मुलीचे लग्न असल्याने दीड महिन्याची सुट्टी घेऊन गावी आले होते. त्यांच्या मुलीचा विवाह 27 फेब्रुवारी रोजी झाला. त्यांची सुट्टी 5 मार्च रोजी सपणार होती. मुलगी लग्न झाल्याने शिर्डी येथे दर्शन घेण्यासाठी गेली होती.त्यामुळे हनुमान लिपने हे शुक्रवारी गावावरून दुचाकीने मुलीस भेटण्यास आणि विमानाचे तिकीट काढण्यासाठी औरंगाबादकडे निघाले होते. मात्र चित्तेगाव जवळ त्यांच्या दुचाकी क्र. एमएच - 21- एजे - 5797 ला पिकअप व्हॅन चालकाने भरधाव व निष्काळजीपणे चालवुन धडक दिल्याने ते गंभीर जखमी झाले. त्यांना नागरिकांनी घाटी रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचार सुरु असताना रात्री अकरा वाजता त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी चिकलठाणा पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करून पिकअप वाहन चालकास ताब्यात घेण्यात आले आहे. पुढील तपास पोलीस हवालदार सुधाकर बोचरे व सुनील सुरासे हे करीत आहेत.
काळाचा घाला भेट अधुरी राहिली हनुमान लिपने यांनी मुलीचे लग्न करून आपले कर्तव्य पार पडले होते. आता पुन्हा कर्तव्यावर जात असल्याने मुलीची भेट कधी होईल म्हूणन ते दुचाकीने येत होते. मात्र नियतीने त्यांना रेल्वे स्टेशन जवळ आल्यावर काळाचा घाला घातला आहे.