नवी दिल्ली : देशात प्लास्टिकच्या (पॉलिमर) नोटा चलनात आणण्याच्या दिशेने भारतीय रिझर्व्ह बँकेने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. लोकसभेत सोमवारी विचारण्यात आलेल्या एका प्रश्नाला उत्तर देताना केंद्रीय अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी सांगितले की, RBI च्या फील्ड ट्रायल अंतर्गत ₹१० आणि ₹२० च्या प्रत्येकी १०० कोटी प्लास्टिक नोटा जारी केल्या जाणार आहेत. या नोटांची एकूण किंमत ₹३,००० कोटी इतकी असेल.
पंकज चौधरी यांनी संसदेत माहिती दिली की, RBI च्या केंद्रीय संचालक मंडळाच्या शिफारशीनंतर केंद्र सरकारकडे फील्ड ट्रायलसाठी प्रस्ताव पाठविण्यात आला होता. तसेच चाचणी यशस्वी झाल्यानंतर ₹१० आणि ₹२० मूल्यवर्गातील पॉलिमर नोटा नियमितपणे चलनात आणण्याची परवानगीही मागण्यात आली होती. या प्रस्तावाला केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे.
या ५ शहरांमध्ये होणार पहिली चाचणी
देशातील विविध हवामान आणि भौगोलिक परिस्थितींमध्ये या नोटांची टिकाऊपणा तपासण्यासाठी RBI ने कोची, म्हैसूर, जयपूर, शिमला, भुवनेश्वर या पाच शहरांमध्ये उष्ण, दमट, कोरडे आणि डोंगराळ अशा वेगवेगळ्या हवामानाचा अनुभव मिळतो. त्यामुळे विविध परिस्थितींमध्ये प्लास्टिकच्या नोटांची गुणवत्ता आणि टिकाऊपणा तपासला जाणार आहे.