सिल्लेखाना परिसरात दोन गटात राडा

Foto
तुफान हाणामारी व दगडफेकीने उडाली तारांबळ
छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो): सिल्लेखाना परिसरात मंगळवारी संध्याकाळी दोन गट अचानक आमनेसामने आल्याने बाचाबाची होऊन ज्याचे रूपांतर काही क्षणातच तुफान हाणामारीत झाले. एका गटाच्या घरावर १५ ते २० मिनिटे अज्ञातांकडून दगडफेक करण्यात आली, ज्यामध्ये घराचे दरवाजे आणि खिडक्यांच्या काचा फुटल्या. अचानक झालेल्या गोंधळामुळे महिला आणि मुलांमध्ये भीतीचे वातावरण पसरले. काही वेळ या मार्गावरील वाहतूकही ठप्प झाली होती.
घटनेची माहिती मिळताच क्रांती चौक पोलिसांसह वरिष्ठ अधिकारी तातडीने घटनास्थळाकडे रवाना झाले. पोलीस उपायुक्त पंकज अतुलकर आणि सहाय्यक
पोलीस आयुक्त सागर देशमुख यांनी फौजफाट्यासह घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी सतर्कता दाखवत उपद्रवी लोकांना फैलावर घेतले आणि जमलेली गर्दी हुसकावून लावत परिस्थिती नियंत्रणात आणली.
चौकशी केली असता, हा वाद दोन गटांमधील नसून जमिनीच्या जुन्या वादातून चुलत काका
आणि पुतण्यामध्ये झाल्याचे समोर आले. नजीर भंगारवाले आणि अबरार बाली यांच्याशी संबंधित या वादात मोकळ्या जागेवरील जुना टीनशेड ३ फूट पुढे वाढवून कच्चे बांधकाम करण्याचा प्रयत्न सुरू होता. पाठीमागील धार्मिक स्थळ आणि मुलांच्या खेळण्याच्या जागेवर अतिक्रमण होईल या कारणातून हा वाद विकोपास गेला.
आरोपींवर कठोर कारवाई करणार
घटनास्थळी पोलिसांनी तातडीने धाव घेतल्यामुळे मोठा अनर्थ टळला. सध्या परिसरात शांतता असून खबरदारीचा उपाय म्हणून मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली असून दगडफेकीत सहभागी असलेल्या तरुणांची ओळख पटवून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याचे संकेत दिले आहेत.
https://epaper.sanjwarta.in/Powered By: Vrudhee Solutions