छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो) : भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील अष्टमी तिथीच्या पावन मुहूर्तावर इस्कॉन मधुबन, अदालत रोड येथे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी राधाष्टमी महोत्सव पारंपारिक विधी-विधानाने मोठ्या हर्षोल्हासात साजरा करण्यात आला.
उत्सवाची सुरुवात राधा-कृष्णांच्या दिव्य पंचामृत अभिषेकाने झाली, ज्यामध्ये शेकडो भाविकांनी उत्साहाने सहभाग घेतला. याप्रसंगी इस्कॉन निगडी, पिंपरी-चिंचवड येथून आलेले
प्रमुख प्रचारक गोपती प्रभू यांनी प्रवचनातून राधाराणींच्या महिमेचे महत्व विशद केले. ते म्हणाले, राधाराणींच्या कृपेशिवाय त्यांची कृपा प्राप्त करणे अशक्य आहे. भगवान श्रीकृष्ण सर्वशक्तिमान आणि सर्वज्ञानी असूनही राधाराणींच्या प्रेमभावात
गदगद असतात. कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी राधाराणी आणि भगवान श्रीकृष्णांची महाआरती करण्यात आली व ५६ भोग अर्पण करण्यात आले. त्यानंतर हजारो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. याप्रसंगी मधुबन सभागृह विविध प्रकारच्या नैसर्गिक फुलांनी आकर्षकरित्या सजवण्यात आले होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी डॉ. रमेश लढ्ढा, माधव मुंडे, विनोद बगडिया, मोनिका ठाकूर, श्वेता झा आणि संपूर्ण भक्त समुदायाचे विशेष योगदान लाभले.
https://epaper.sanjwarta.in/Powered By: Vrudhee Solutions















