मोदी त्यांच्या १५ श्रीमंत मित्रांचे कर्ज माफ करतात, शेतकऱ्यांचेही कर्ज त्यांना माफ करावे लागेल - राहुल गांधी

Foto

नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांच्या १५ श्रीमंत मित्रांचे कर्ज माफ केले आहे, मात्र शेतकऱ्यांचे कर्ज  माफ करण्यास ते नकार देत आहेत. आता शेतकरी आणि तरुणांच्या भविष्यासाठी पंतप्रधान बदलण्याची गरज पडली तर तेही आम्ही करु. शेतकऱ्यांसाठी कायदाही बदलावा लागला तरी आम्ही मागे हटणार नाही, असे आश्वासन काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी दिल्लीतील किसान मुक्ती मोर्चात दिले. देशभरातील शेतकऱ्यांचा मोर्चा दिल्लीत पोहोचला आहे. या मोर्चाच्या मंचावर शुक्रवारी राहुल गांधी यांच्यासह सीताराम येचुरी, फारुख अब्दुल्ला, शरद पवार, शरद यादव, अरविंद केजरीवाल, राजु शेट्टी, कन्हय्या कुमार, जिग्नेश मेवानी एकत्र आले.

 

राहुल गांधींनी यावेळी मोदी आणि भाजपवर हल्लाबोल केला. ते म्हणाले, पंतप्रधानांनी त्यांच्या जवळच्या १५ मित्रांचे साडे तीन लाख कोटी रुपयांचे कर्ज माफ केले आहे. मात्र शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्यास, त्यांच्या पीकाला दीडपट हमीभाव देण्याच्या आश्वासनापासून ते दूर पळत आहेत. मात्र शेतकऱ्यांचे कर्जही माफ होऊ शकते, असा दावा राहुल गांधींनी केला. मोदी सरकार आता फक्त अदानी आणि अंबानींसाठीच काम करत असल्याची टीका त्यांनी केली.

 

देशभरातून आलेल्या शेतकऱ्यांना राहुल गांधींनी आश्वस्त केले की शेतकऱ्यांसाठी कायदा बदलण्याची गरज पडली तर तेही आम्ही करु. ते म्हणाले, विरोधीपक्षाचे सर्व नेते येथे उपस्थित आहेत. आमची विचारधारा वेगळी असली तरी शेतकरी आणि तरुणांच्या प्रश्नांवर आम्ही एक आहोत.

 

मोदींनी अदानी-अंबानींना देश वाटून दिला

राहुल गांधी म्हणाले, शेतकऱ्यांना अनिल अंबानींचे विमान नको आहे. त्यांना त्यांच्या घामाचा दाम आणि हक्काचेच हवे आहे. शेतकऱ्यांना कर्जमाफी, पीकविमा आणि शेतमालाला दीडपट हमी भावाचे आश्वासन मोदींनी दिले होते. मात्र आता ते त्यांचे आश्वासन विसरले आहेत. त्यांनी शेतकऱ्यांना पीकविमा कोणत्या कंपनीचा घ्यावा याचेही स्वातंत्र्य ठेवलेले नाही. काही शहरे अदानींना अंदन दिली तर काही अंबानींच्या कंपनीला दिली आहेत.

राफेल मुद्द्यावरुन पुन्हा एकदा मोदींना घेरत राहुल गांधी म्हणाले, मोदी इंडियन एअरफोर्सचे ३० हजार कोटी रुपये अनिल अंबानीला देऊ शकतात. ते त्यांच्या १५ मित्रांना साडेतीन लाख कोटी रुपये माफ करु शकतात, मग ते शेतकऱ्यांचे कर्जही माफ करु शकता. मोदींना शेतकऱ्यांचे कर्ज माफ करावेच लागेल.

 

मते मागण्यासाठी अदानी-अंबानींकडेच जावे लागणार

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनीही मोदींवर अदानी आणि अंबानींसोबतच्या त्यांच्या मैत्रीवरुन तोफ डागली. केजरीवाल म्हणाले, शेतकऱ्यांचे कर्ज माफ केले नाही तर २०१९ मध्ये मोदी आणि भाजपला शेतकऱ्यांचे मत मिळणार नाही. त्यांना मत मागण्यासाठीही मग अदानी आणि अंबानींकडेच जावे लागणार.

 

संसदेचे विशेष अधिवेशन बोलवा

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी शेतकर्‍यांच्या दोन प्रमुख मागण्या असल्याचे सांगितले. ते म्हणाले, शेतकऱ्यांच्या हिताचा कायदा करण्यासाठी संसदेचे विशेष अधिवेशन बोलवावे व या मागण्या मान्य कराव्यात. ते म्हणालेशेतकर्‍यांच्या मागण्या मान्य करणारा व्यक्‍तीच देशावर राज्य करणार. शेतकरी ज्याला पाठिंबा देतील त्याचीच सत्ता येईल. जो शेतकर्‍यांकडे दुर्लक्ष करणार त्याचे नुकसानच होईल. देशातील कानाकोपर्‍यातील शेतकरी या मोर्चात सामील झाले आहेत.