नवी दिल्ली : गोकुळ दूध संघाच्या अध्यक्ष निवडीवरून पेटलेला राजकीय वाद आता थेट राष्ट्रीय पातळीवर पोहोचला आहे. गोकुळच्या संचालक मंडळात चार शासकीय सदस्य वाढवून त्यांना मतदानाचा हक्क देण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयावर लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी भाजप आणि महायुतीवर टीका केली. गोकुळमध्ये दूध उत्पादकांनी भाजपचा पराभव केला, म्हणून भाजपने थेट निवडणुकीनंतर नियम बदलून बहुमताची चोरी केली, असा आरोप राहुल गांधी यांनी केला आहे.
राहुल गांधी यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट करत भाजपवर टीका केली. गोकुळमध्ये दूध उत्पादकांनी भाजपचा पराभव केला. त्यामुळे भाजपने निवडणुकीनंतर थेट नियमच बदलले, चार संचालक वाढवले, १२ चे १६ केले आणि बहुमत चोरले. ही दूध उत्पादक शेतकर्यांच्या मतांची उघड चोरी आहे.
भाजप सत्तेसाठी इतका हताश झाला आहे की, सर्वत्र सत्ता टिकवून ठेवण्यासाठी तो आता कोणत्याही थराला जात आहे. मात्र, जे दूध उत्पादक शेतकर्यांची मते चोरतात, त्यांनी एक गोष्ट पक्की लक्षात ठेवावी, देशातील शेतकरी हा अन्याय कधीही विसरत नाही, असेही राहुल गांधी यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.
काय आहे गोकुळमधील वादाची पार्श्वभूमी?
गोकुळ दूध संघाच्या पंचवार्षिक निवडणुकीत आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखालील राजर्षी शाहू शेतकरी समविचारी आघाडीने २५ पैकी १३ जागा जिंकून बहुमत मिळवले होते, तर भाजप-महायुती आघाडीला १२ जागांवर समाधान मानावे लागले होते. मात्र, अध्यक्ष निवडीच्या पहिल्या सभेला महायुतीचे १२ संचालक गैरहजर राहिल्याने कोरमअभावी सभा तहकूब झाली. उच्च न्यायालयाने १० नोव्हेंबरपर्यंत विशेष सभा घेऊन निवड पूर्ण करण्याचे आदेश दिले असतानाच, राज्य मंत्रिमंडळाने गोकुळवर चार शासकीय सदस्य नेमून त्यांना अध्यक्षपदाच्या निवडणुकीत थेट मतदानाचा अधिकार देण्याचा निर्णय घेतला. यामुळे महायुतीचे संख्याबळ १२ वरून थेट १६ वर पोहोचले आणि सत्तेची गणिते पूर्णपणे बदलली.
सतेज पाटलांच्या भूमिकेला बळ
आमदार सतेज पाटील यांनी कालच ङ्गङ्घहा साडेपाच लाख शेतकर्यांच्या जनाधाराचा अपमान असून आम्ही रस्त्यावर उतरू आणि कायदेशीर लढा देऊ,ङ्घङ्घ असा इशारा दिला होता. आता काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी स्वतः या विषयावर थेट भूमिका घेतल्याने, गोकुळच्या अध्यक्ष निवडीतील शासकीय हस्तक्षेपाचा मुद्दा आता फक्त कोल्हापूर किंवा महाराष्ट्रापुरता मर्यादित न राहता राष्ट्रीय पातळीवर पोहोचला आहे.