राहुल गांधींची विरोधी नेत्यांसोबत चाय पे चर्चा, 8 दिवसांत ज्ञानेश कुमारांविरोधात 5 आंदोलचा निर्णय

Foto
नवी दिल्ली : एसआयआर आणि ज्ञानेश कुमार यांच्या मुद्द्यावरून दिल्लीत सुरू असलेल्या इंडिया ब्लॉकच्या आंदोलनासंदर्भात दिल्ली पोलिसांनी चार एफआयआर दाखल केले आहेत. हे एफआयआर कनॉट प्लेस, टिळक मार्ग, बाराखंबा आणि मंदिर मार्ग पोलीस ठाण्यांमध्ये दाखल करण्यात आले आहेत. दरम्यान, लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आज दुपारी 4 वाजता सर्व विरोधी पक्षांच्या नेत्यांना त्यांच्या निवासस्थानी चाय पे चर्चा करण्यासाठी आमंत्रित केलं आहे. राहुल गांधी यांनी पोस्ट करत माहिती दिली आहे. 

राहुल गांधींची विरोधी नेत्यांसोबत चाय पे चर्चा 
राहुल गांधी यांनी पोस्ट करत म्हटलं आहे की, आज मी इंडिया आघाडीचे नेते, विरोधी पक्षांचे खासदार, विद्यार्थी संघटना आणि नागरी समाजातील सहकाऱ्यांना माझ्या घरी चहासाठी आमंत्रित केले आहे. लोकशाहीच्या रक्षणासाठीच्या या जनआंदोलनात आपण सर्व एकजूट आहोत आणि हे आंदोलन सुरूच राहील. चहानंतर, आम्ही सर्वजण माध्यमांसमोर आपली मते मांडू. सर्व आंदोलने एकच असतात (All protests are one) राहुल यांच्या All protests are one या लाईनची विशेष चर्चा रंगली आहे. सीजेपीकडून आंदोलन सुरु असलं, तरी त्यांच्या लीडरशीपकडून आतापर्यंत राहुल गांधी यांची भेट घेण्यात आलेली नाही. काल सुप्रीम कोर्टावरील मोर्चातही सीजेपी आणि आप सामील झाले नव्हते. त्यामुळे आजच्या चर्चेत सीजेपी सामील होणार का? याची उत्सुकता असेल. दुसरीकडे, दिल्लीत रस्त्यावरची लढाई लढत असलेली नेहा बोरा सुप्रीम  कोर्टावरील मोर्चात सहभागी झाली होती. त्यामुळे आता सीजेपीकडून अभिजित दिपके या चर्चेत सामील होणार का याकडे लक्ष असेल.

सर्वोच्च न्यायालयापर्यंत मोर्चा
दुसरीकडे, एसआयआरच्या निषेधार्थ विरोधी पक्षांनी बाराखंबा रोडपासून सर्वोच्च न्यायालयापर्यंत मोर्चा काढला. या आंदोलनात मल्लिकार्जुन खरगे, राहुल गांधी, तेजस्वी यादव आणि अखिलेश यादव यांच्यासह 11 पक्षांच्या नेत्यांनी सहभाग घेतला. विरोधी पक्षांच्या खासदारांनी एसआयआरसंदर्भात सर्वोच्च न्यायालयात एक याचिकाही दाखल केली आहे. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी आणि एसआयआरच्या विरोधात विरोधी पक्षांच्या खासदारांनी 6, 7, 8, 9 आणि 12 ऑक्टोबर रोजी निदर्शने केली. या आंदोलनादरम्यान राहुल आणि प्रियांका गांधी यांना पोलिसांनी तीन वेळा ताब्यात घेतले. राहुल गांधी, अखिलेश यादव आणि तेजस्वी यादव यांच्यासह 11 विरोधी नेत्यांनी दाखल केलेल्या याचिकेत सर्वोच्च न्यायालयाच्या रजिस्ट्रीने सुमारे 14 त्रुटी निदर्शनास आणल्या आहेत. ही याचिका मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरावलोकनात (SIR) मोठ्या प्रमाणावर नावे वगळल्याच्या आणि अनियमिततेच्या आरोपांशी संबंधित आहे.

पीटीआय या वृत्तसंस्थेनुसार, रजिस्ट्रीने याचिकाकर्त्यांच्या वकिलांकडे काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या ओळखपत्राची स्पष्ट प्रत मागितली आहे. नऊ याचिकाकर्त्यांनी याचिका दाखल करण्यासाठी लेखी संमती दिली नाही. याचिकेसोबत सादर केलेल्या कागदपत्रांमधील काही पाने वाचता येत नाहीत, काही गहाळ आहेत आणि न्यायालयीन शुल्कही 220 रुपये कमी असल्याचे रजिस्ट्रीने नमूद केले. 12 ऑक्टोबर रोजी दाखल केलेल्या याचिकेत भारतीय निवडणूक आयोग, मुख्य निवडणूक आयुक्त (सीईसी) ज्ञानेश कुमार आणि इतर निवडणूक आयुक्त सुखबीर सिंग संधू व विवेक जोशी यांना पक्षकार म्हणून नाव देण्यात आले आहे.

मोर्चाविरोधात चार एफआयआर दाखल
दुसरीकडे, दिल्ली पोलिसांनी सर्वोच्च न्यायालयाकडे निघालेल्या मोर्चासंदर्भात चार एफआयआर दाखल केले आहेत. पोलिसांच्या सूत्रांनुसार, हे गुन्हे कनॉट प्लेस, बाराखंबा रोड, टिळक मार्ग आणि मंदिर मार्ग पोलीस ठाण्यांमध्ये नोंदवण्यात आले आहेत.

विरोधी पक्षांच्या नेत्यांचा सर्वोच्च न्यायालयाकडे मोर्चा
राहुल गांधी आणि इतर अनेक विरोधी पक्षांच्या नेत्यांनी सोमवारी एक याचिका दाखल करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडे मोर्चा काढला. या याचिकेत सर्वोच्च न्यायालयाच्या एका निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली एक स्वतंत्र समिती स्थापन करण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच, या समितीत तांत्रिक तज्ञ आणि प्रतिष्ठित नागरिकांचा समावेश असावा, अशीही मागणी करण्यात आली आहे. या याचिकेत म्हटले आहे की, या समितीने मतदार यादीतून वगळलेल्या नावांचे आणि विशेष सुधारणा प्रक्रियेदरम्यान (एसआयआर) केलेल्या बदलांचे विहित वेळेत स्वतंत्र लेखापरीक्षण (ऑडिट) करावे.