दरेकर म्हणतात, राहुल पडले
जिल्ह्यातील अतिवृष्टीने खराब झालेल्या खरीप पिकांची पाहणी करण्यासाठी आलेल्या विधान परिषद विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी शेतकर्यांना तातडीने मदत मिळाली नाही तर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला. दुसरीकडे उत्तर प्रदेशात राहुल गांधींना धक्काबुक्की झाल्याचे नाकारत राहुल स्वतः पडले असा दावा केला. तर केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी राहुल गांधींचा तोल गेला, असे सांगत योगी सरकारवरचे आरोप फेटाळले
मराठवाड्यात अतिवृष्टीने खरीप पिके हातची गेल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी काल जिल्ह्याचा दौरा करीत शेतकर्यांच्या गाठीभेटी घेतल्या. बांधावर जात त्यांनी पीक परिस्थितीची पाहणी केली. बागायती शेतीसाठी हेक्टरी 50 हजार तर जिरायती शेतीसाठी 25 नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी केली. उत्तर प्रदेशातील हाथरस प्रकरणावर बोलताना त्यांनी योगी सरकारचा मात्र बचाव केला.
राहुल गांधी यांना पोलिसांनी धक्काबुक्की केल्याचे विचारताच दरेकर यांनी राहुल गांधींना पोलिसांनी धक्का दिल्याचे नाकारले. राहुल गांधी स्वतः खाली पडल्याचे दावा दरेकर यांनी केला.
दुसरीकडे केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी हाथरस प्रकरणावर भाष्य केले. योगी सरकार कठोर कारवाई करत असल्याचे सांगत पोलिसांनी राहुल गांधी यांना अडविलेले मात्र धक्काबुक्की केली नाही. या गोंधळात राहुल गांधी यांचा तोल गेल्याचा दावा मंत्री दानवे यांनी केला.
एकंदरीत उत्तर प्रदेशातील हाथरस प्रकरणाने राज्यातही संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. काँग्रेस राष्ट्रवादीसह, रिपब्लिकन आणि डाव्या पक्षांनी आंदोलने सुरू केली आहेत. त्यामुळे भाजप नेते जातील तिथे उत्तर प्रदेशातील प्रकरणाच्या प्रश्नांचा भडीमार होत आहे. मात्र काल भाजपच्या दोन्ही वरिष्ठ नेत्यांनी योगी सरकारचा बचाव केला.