नवी दिल्ली : संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात झालेल्या गोंधळ, अविश्वास प्रस्ताव आणि विरोधकांच्या भूमिकेवरून राजकीय वातावरण तापले आहे. या पार्श्वभूमीव, केंद्रीय संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू यांनी थेट विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधला आहे. संसदेतील गोंधळासाठी राहुल गांधीच जबाबदार असल्याचा आरोप करत, रिजिजूंनी त्यांचे वर्तन ङ्गङ्घगैरजबाबदारफफ असल्याचे म्हटले.
माध्यमांना दिलेल्या मुलाखतीत किरेन रिजिजू म्हणाले, राहुल गांधी भारतविरोधी शक्तींशी संलग्न आहेत. ते देश-विदेशातील नक्षलवादी, कट्टरतावादी विचारवंत आणि जॉर्ज सोरोससारख्या व्यक्तींशी भेटतात. विरोधी पक्षनेता संपूर्ण विरोधकांचे प्रतिनिधित्व करतो; मात्र सभागृहाबाहेर जाऊन लोकांना गद्दार ठरवणे, नाट्यमय आंदोलणे करणे आणि अप्रकाशित पुस्तक वाचण्यावर आग्रह धरणे, हे सर्व बालिश वर्तन आहे. संसदीय इतिहासात असा विरोधी पक्षनेता कधी पाहिला नाही. त्यांचे संबंध नेहमी देशविरोधी भूमिका घेणार्यांशी असतात. येत्या काळात योग्य ती कारवाई करण्यात येईल.
एपस्टीन फाइल्सवरून राहुल गांधींना प्रत्युत्तर
राहुल गांधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव एपस्टीन फाइल्सशी जोडल्याच्या आरोपांवर प्रतिक्रिया देताना रिजिजू म्हणाले, राहुल गांधींचे समर्थकही हे गंभीरपणे घेत नाहीत, कारण ते कोणताही पुरावा न देता आरोप करतात. पंतप्रधानांनी कुणाला भेटले असल्याचा किंवा कोणतेही दस्तऐवज असल्याचा पुरावा असल्यास तो सादर करावा. निराधार आरोप केल्याने केवळ निराशा आणि हताशा वाढते.
संसदीय गोंधळावर भाष्य
संसदेतील गोंधळाबाबत बोलताना रिजिजू यांनी मान्य केले की, संसदीय लोकशाहीत गोंधळ, गदारोळ होतोच. मात्र, गोंधळादरम्यान संसदेत होणारे प्रत्यक्ष कामही पाहायला हवे. आम्ही विरोधात असताना अध्यक्षांवर कधीही कागद फेकले नाहीत, सत्ताधार्यांच्या बाकांमध्ये बॅनर नेले नाहीत. आजचा विरोधक इतका असंयमित का झाला आहे, याची मला चिंता वाटते. पूर्वी काँग्रेसमध्ये परिपक्व नेते होते. आज मात्र संपूर्ण पक्ष राहुल गांधींसारखा झाला आहे. त्यांच्या भोवतालचे लोकही त्यांच्यासारखेच झाले आहेत, अशी टीका रिजिजूंनी केली.
अविश्वास प्रस्तावावरून राजकीय तापमान वाढणार...
लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याविरोधातील काँग्रेसच्या अविश्वास प्रस्तावावर रिजिजू यांनी बिर्लांची प्रशंसा केली. अध्यक्षांचे काम सभागृह चालवणे, सरकारची कामे पुढे नेणे आणि विरोधकांना बोलण्याची संधी देणे आहे. विरोधक त्यांच्याच कक्षात घुसून निदर्शने करत असतानाही ओम बिर्ला यांनी संयम दाखवला. सोमनाथ चटर्जी यांच्यासारखे अध्यक्ष असते, तर कदाचित सर्वांना निलंबित केले असते.