सोनिया गांधींच्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे राहुल गांधींचा केरळ दौरा रद्द

Foto
नवी दिल्ली  : काँग्रेसच्या माजी अध्यक्षा तथा खासदार सोनिया गांधी यांची प्रकृती मंगळवारी रात्री अचानक बिघडल्यामुळे त्यांना दिल्लीमधील सर गंगाराम रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. आता सोनिया गांधी यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असून तज्ज्ञ डॉक्टरांचं एक पथक त्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून आहे.

सोनिया गांधी यांच्या प्रकृती अस्वस्थतेमुळे लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी त्यांचा केरळ दौरा रद्द केला असल्याची माहिती समोर आली आहे. सध्या केरळ विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. त्या पार्श्वभूमीवर आज केरळच्या कोझिकोड या ठिकाणी एका सभेला संबोधित करण्यासाठी राहुल गांधी उपस्थित राहणार होते. मात्र, सोनिया गांधी यांची प्रकृती अचानक बिघडल्यामुळे राहुल गांधी यांनी त्यांचा दौरा रद्द केला आहे.

आता राहुल गांधी यांच्या ऐवजी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे हे केरळच्या कोझिकोड येथील सभेला उपस्थित राहून संबोधित करणार आहेत. 

सोनिया गांधींची प्रकृती स्थिर, डॉक्टरांची माहिती
प्राथमिक माहितीनुसार, सोनिया गांधी यांना श्वास घेण्यास त्रास होत होता. मंगळवारी रात्री १ च्या नंतर सोनिया गांधी यांना अचानक अस्वस्थ वाटू लागलं. त्यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं. रुग्णालयातील वरिष्ठ डॉक्टर डॉ.अनुप बसू यांच्या देखरेखीखाली त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. वैद्यकीय पथकाने दिलेल्या माहितीनुसार, सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे.

प्रियंका गांधी आणि राहुल गांधीही पोहचले रुग्णालयात
सोनिया गांधी यांची प्रकृती बिघडल्याचे वृत्त समजताच राहुल गांधी आणि खासदार प्रियंका गांधी हे दोघंही तातडीने सर गंगाराम रुग्णालयात पोहोचले. प्रियंका गांधी सध्या आई सोनिया गांधींसह रुग्णालयातच उपस्थित आहेत. त्या सध्या रुग्णालयातच असून डॉक्टरांकडून वेळोवेळी प्रकृतीचा आढावा घेत आहेत. तूर्तास त्यांची प्रकृती स्थिर आहे असं सांगण्यात आलं आहे.