आरएसएस मानहानी प्रकरणात राहुल गांधी भिवंडी कोर्टात हजर; काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ नवे जामीनदार

Foto
मुंबई  : लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी आज (२१ फेब्रुवारी) भिवंडी कोर्टात हजेरी लावली. २०१४ मधील आरएसएस मानहानी प्रकरणात ते अतिरिक्त सत्र न्यायालयात हजर झाले. यापूर्वी माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील यांनी राहुल गांधींच्या जामिनासाठी जामीनदार म्हणून काम पाहिले होते. मात्र त्यांच्या निधनानंतर आता राहुल गांधी यांचे जामीनदार काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ असतील. राहुल गांधी दिल्लीहून एअर इंडियाच्या विमानाने मुंबईत आले. मुंबईहून ते रस्त्याने भिवंडीला न्यायालयात पोहोचले. त्यांनी मुख्य न्याय दंडाधिकारी न्यायालयात हजर राहत नवा जामीनदार दिला.
  
राहुल गांधी यांना काळे झेंडे दाखवले

दरम्यान, राहुल गांधी यांना भाजप कार्यकर्त्यांकडून काळे झेंडे दाखवण्यात आले. त्यांना वेळीच पोलिसांनी हस्तक्षेप करत रोखले. राहुल गांधी यांच्या दौर्‍याच्या पार्श्वभूमीवर ठाणे पोलिसांनी न्यायालय परिसरात कडेकोट बंदोबस्त ठेवला होता. खबरदारी म्हणून न्यायालयाच्या १०० मीटर परिसरातील दुकानेही बंद ठेवण्यात आली. सुनावणीनंतर राहुल गांधी पुन्हा रस्त्याने मुंबई विमानतळाकडे रवान झाले. भिवंडी कोर्टातून बाहेर पडल्यानंतर राहुल गांधी यांच ताफा भिवंडी शहरातून बाहेर पडत असताना भिवंडी शहरातील नागरिकांना हात  दाखवत अभिवादन केले.
 
काँग्रेस नेत्यांकडून राहुल यांचे स्वागत 

दरम्यान, काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या स्वागतासाठी मुंबई विमानतळावर उपस्थित होते. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, नसीम खान यांनी राहुल गांधी यांचे स्वागत केले.
 
खासदार सुरेश म्हात्रेंनी घेतली राहुल गांधींची भेट

दरम्यान, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे खासदार सुरेश मात्रे उर्फ बाळ मामा यांनी राहुल गांधी यांची भेट घेतली. १२ वर्षे होऊन गेले या घटनेला तरी देखील अजूनही केस सुरू आहे हे दुर्दैव असल्याचे सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्या मामा यांनी सांगितले.