अमेरिका ट्रेड डीलवरून राहुल गांधी यांचा संसदेत सरकारविरुद्ध हल्ला बोल

Foto
नवी दिल्ली : दीर्घकाळ चाललेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी बुधवारी सभागृहात केंद्र सरकारवर जोरदार प्रहार केला. अमेरिकेसोबत झालेल्या व्यापारी करारावरून राहुल गांधींनी मोदी सरकारला धारेवर धरले. "मोदी सरकारने अमेरिकेच्या दबावाखाली येऊन देशाचा डेटा आणि स्वाभिमान गहाण ठेवला आहे," असा खळबळजनक आरोप करत राहुल गांधींनी संसदेत वादळ निर्माण केले. यावेळी त्यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनाही खडे बोल सुनावले.

दरम्यान "ज्या डेटाच्या जोरावर भारत २१ व्या शतकात महासत्ता बनू शकला असता, तोच डेटा मोदी सरकारने परकीयांच्या हाती सोपवला आहे," असा घणाघाती आरोप करत राहुल गांधींनी सत्ताधाऱ्यांना निरुत्तर केले.
राहुल गांधींनी आपल्या भाषणात डिजिटल अर्थव्यवस्थेवर भर दिला. ते म्हणाले, "अमेरिका आणि चीनमधील स्पर्धेत आज सर्वात मौल्यवान काय असेल, तर तो भारतीयांचा डेटा आहे. अमेरिकेला जर त्यांचे डॉलरचे वर्चस्व टिकवून ठेवायचे असेल, तर त्यांना भारतीय डेटाची गरज आहे. मात्र, मोदी सरकारने या ट्रेड डीलमध्ये आपल्या डेटावरील नियंत्रण सोडून दिले आहे. अमेरिकेमध्ये फ्री डेटा फ्लो आणि डिजिटल टॅक्सवर मर्यादा आणून सरकारने देशाचे नुकसान केले आहे."

आम्ही ट्रम्प यांचे नोकर नाही! - राहुल गांधी

राहुल गांधींनी आपल्या भाषणात डोनाल्ड ट्रम्प यांना थेट संदेश दिला. "जर इंडिया आघाडीने राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्याशी चर्चा केली असती, तर आम्ही स्पष्ट केले असते की, आम्ही तुमचे मित्र आहोत, पण नोकर नाही. आम्ही त्यांच्याशी बरोबरीच्या नात्याने बोललो असतो. ट्रम्प यांना जर भारतीय डेटाचा ॲक्सेस हवा असेल, तर त्यांनी आमच्याशी सन्मानाने वागले पाहिजे," असे राहुल गांधी ठणकावून म्हणाले.

शेतकरी आणि ऊर्जा सुरक्षेवरून सरकारवर ओढले ताशेरे

राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या धोरणांवर टीका करताना तीन महत्त्वाचे मुद्दे मांडले. ते म्हणाले की, आपली ऊर्जा सुरक्षा ही सर्वोपरि आहे आणि ती आम्ही कोणत्याही परिस्थितीत वाचवू. ट्रम्प यांना त्यांच्या शेतकऱ्यांचे हित पाहायचे आहे, पण आम्हाला आमच्या शेतकऱ्यांचे संरक्षण करणे महत्त्वाचे वाटते. अमेरिकेने भारताला पाकिस्तानच्या बरोबरीने लेखू नये. जर, ट्रम्प पाकिस्तानच्या लष्करप्रमुखांसोबत नाश्ता करत असतील, तर भारताने त्यावर आपली भूमिका स्पष्ट मांडायला हवी.

"पंतप्रधान दबावाखाली आहेत"; 'एपस्टीन' फाइलवरून राहुल गांधींचा मोठा आरोप

"मी थेट सांगतोय की, तुम्ही भारत विकला आहे. तुम्हाला भारत विकताना लाज वाटत नाही का? तुम्ही आपल्या आईला, म्हणजेच भारत मातेला विकले आहे. यातली धक्कादायक गोष्ट म्हणजे, मला माहित आहे की सामान्य परिस्थितीत पंतप्रधान देशाला विकणार नाहीत. मग त्यांनी भारत का विकला, हे तुम्हाला माहिती आहे का? कारण त्यांनी (अमेरिकेने/परकीय शक्तींनी) पंतप्रधानांचा गळा आवळला आहे. त्यांनी पंतप्रधानांची मान पकडली आहे. आम्हाला पंतप्रधानांच्या डोळ्यात भीती स्पष्ट दिसतेय. यामागे दोन मुख्य गोष्टी आहेत- पहिली म्हणजे 'एपस्टीन'. या प्रकरणातील ३० लाख फाईल्स अजूनही बंद आहेत," असे राहुल गांधींनी म्हटलं.

काय आहे राहुल गांधींचे सरकारवरील ५ मोठे आरोप?
१. डिजिटल ट्रेड रूल्सवरील नियंत्रण भारताने सोडून दिले आहे. 
२. 'डेटा लोकलायझेशन'ची अट शिथिल करण्यात आली. 
३. अमेरिकेला विनामूल्य डेटा फ्लोची परवानगी दिली. 
४. डिजिटल टॅक्सवर मर्यादा आणल्या. 
५. मोठ्या कंपन्यांना २० वर्षांची टॅक्स हॉलिडे देऊन देशाचे नुकसान केले.