अमित शाह मानहानी प्रकरणात राहुल गांधी निर्दोष, अपघातातूनही बचावले सुनावणीसाठी जात असताना ताफ्यातील वाहने एकमेकांवर आदळली !

Foto
सुलतानपूर : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह मानहानी प्रकरणात काँग्रेस नेते राहुल गांधी यांना मोठा दिलासा मिळाला आहे. अमित शाह यांच्यावर केलेल्या टिप्पणीच्या प्रकरणात राहुल गांधी यांची निर्दोष सुटका झाली आहे. सुल्तानपुर न्यायालयाने सोमवारी राहुल गांधी यांची निर्दोष सुटका केली. राहुल गांधी यावेळी न्यायालयात उपस्थित होते. विशेष म्हणजे याच खटल्याच्या सुनावणीला हजर राहण्यासाठी जात असताना त्यांच्या ताफ्यातील वाहनांना अपघात झाला होता. यात दोन जण जखमी झाले असले तरी राहुल गांधी सुखरुप असल्याचे पोलिसांनी सांगितले.
 
उत्तर प्रदेशातील पूर्वांचल एक्स्प्रेसवेवर सोमवारी सकाळी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या ताफ्यातील पाच गाड्या आणि एक रुग्णवाहिका एकमेकांवर जोरदार आदळल्या. सुदैवाने राहुल गांधी पूर्णपणे सुरक्षित असून त्यांना कोणतीही दुखापत झाली नाही. प्राथमिक माहितीनुसार, एक्स्प्रेसवेवरील ९१ किलोमीटर मैलदंडाजवळ ताफ्यातील पाच गाड्या आणि एक रुग्णवाहिका एकमेकांवर आदळल्या. या अपघातात काँग्रेसच्या कार्यकर्ते, पदाधिकारी आणि सुरक्षेच्या काही लोक जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे. 

राहुल गांधी सोमवारी उत्तर प्रदेशच्या दौर्‍यावर आहेत. ते सुलतानपूरला जात होते. आज त्यांना कोर्टात हजर राहायचे असल्यामुळे ते सकाळीच दिल्लीहून लखनौला पोहोचले. लखनौहून सुलतानपूरला जाताना पूर्वांचल एक्स्प्रेसवेवर त्यांच्या ताफ्यात हा अपघात झाला. धडकेनंतर घटनास्थळी गोंधळाची स्थिती निर्माण झाली. आतापर्यंत कोणत्याही जिवितहानीची बातमी नाही.

सुलतानपूर कोर्टातील प्रकरण काय होते ? 
 भाजप नेते विजय मिश्र यांनी २०१८ मध्ये राहुल गांधी यांच्या  विरोधात मानहानीची याचिका दाखल केली होती. आधी हे प्रकरण सिविल कोर्टात मग एमपी-एमएलए कोर्टात गेलं. एमपी-एमएलए कोर्टाचे मॅजिस्ट्रेट शुभम वर्मा यांनी निकालाच्या दिवशी राहुल गांधी यांना उपस्थित रहायला सांगितलं होतं. मे २०१८ मध्ये कर्नाटक विधानसभा निवडणूक प्रचारादरम्यान राहुल गांधी यांनी बंगळुरुमध्ये एक पत्रकार परिषद आयोजित केली होती. त्यावेळी राहुल गांधींनी भाजपचे तत्कालीन राष्ट्रीय अध्यक्ष आणि वर्तमान केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याबद्दल टिप्पणी केली होती. राहुल गांधींच्या या टिप्पणीला मानहानीकारक ठरवून भाजपं नेते आणि सुल्तानपूर जिल्हा सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष विजय मिश्रा यांनी ४ ऑगस्ट २०१८ रोजी राहुल गांधींविरोधात याचिका दाखल केली होती.

तीन साक्षीदार केले सादर
दरम्यान कोर्टात सुनावणी झाल्यानंतर २७ नोव्हेंबर २०२३ रोजी राहुल गांधी यांना आरोपी मानून समन जारी करण्यात आलेलं. २० फेब्रुवारी २०२४ रोजी राहुल गांधी स्वत: सुल्तानपूर कोर्टात हजर राहिले. त्यांना २५-२५ हजार रुपयांच्या दोन मुचलक्यांवर जामिन मंजूर झालेला. राहुल गांधी यांनी हे आरोप फेटाळून लावताना हे सत्ताधारी पक्षाचं कारस्थान असल्याचं म्हटलं होतं. न्यायालयाने सुनावणी दरम्यान तक्रारदार विजय मिश्रा, अनिल मिश्रा आणि रामचंद्र दुबे तीन साक्षीदारांच्या जबानी नोंदवल्या. गेल्या ८ वर्षापासून हे प्रकरण चालू होते. 

खरं तर, राहुल गांधींनी निवडणूक प्रचारात म्हटले होते, भारतातील लोक हे विसरतात की भाजपचे अध्यक्ष हत्या प्रकरणात आरोपी आहेत ही सत्यता आहे. ही टीका सोहराबुद्दीन शेख कथित खोट्या प्रकरणाशी संबंधित होती. अमित शाह यांना या प्रकरणात २०१४ मध्ये मुंबईच्या विशेष सीबीआय न्यायालयाने आरोपांमधून मुक्त केले होते. याच विधानांना आधार बनवून विजय मिश्रा यांनी राहुल गांधींविरुद्ध फौजदारी मानहानीचा खटला दाखल केला. या प्रकरणात सुलतानपूरच्या विशेष एमपी-एमएलए न्यायालयाने नोव्हेंबर २०२३ मध्ये राहुल गांधींना समन्स बजावले होते. ते २० फेब्रुवारी २०२४ रोजी न्यायालयात हजर झाले, जिथे त्यांना जामीन मिळाला. त्यानंतर जुलै २०२४ आणि फेब्रुवारी २०२६ मध्येही त्यांनी न्यायालयात आपले म्हणणे मांडले. राहुल गांधींनी आरोपांना नकार देत तक्रार राजकीय द्व्ोषभावनेतून प्रेरित असल्याचे सांगितले. खटल्यादरम्यान तक्रारदार पक्षाकडून साक्षीदार आणि पुरावे सादर करण्यात आले. नंतर दोन्ही पक्षांची अंतिम युक्तिवाद पूर्ण झाल्यानंतर न्यायालयाने २६ ऑक्टोबर २०२६ रोजी निर्णयाची तारीख निश्चित केली होती.