राहुल गांधींनी आता मोदींना पप्पू ठरवलंय, पंतप्रधानांची मिमिक्री करत संजय राऊतांचा हल्लाबोल

Foto
मुंबई  : मध्य प्रदेशातील इंदूर येथे आयोजित करण्यात आलेल्या छात्रों की गूंज या विशेष कार्यक्रमात लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी शनिवारी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. राहुल गांधी मंचावर उपस्थित असतानाच स्टँड-अप कॉमेडियन पुलकित मणीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बोलण्याच्या आणि वागण्याच्या पद्धतीची नक्कल करत स्टँड-अप कॉमेडी सादर केली. या प्रकारावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राहुल गांधी यांना टोला लगावला. मला वाटते की आता राहुल गांधींकडे हेच काम शिल्लक आहे. त्यांनी स्टँड अप कॉमेडीचे काम हाती घेतले आणि मिमिक्री केली तर त्यांना चांगला रोजगार मिळू शकेल. पक्षाला त्यांनी बेरोजगार केले आहेच, असा देवेंद्र फडणवीस म्हणाले. यावरून शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर घणाघात केलाय.
 
संजय राऊत म्हणाले की, लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी मारलेला बाण हा भाजपच्या काळजाच्या आरपार घुसला आहे. राहुल गांधींनी भारताच्या परराष्ट्र धोरणाची गळ्यात पडण्याची परिस्थिती काय आहे हे सोप्या शब्दात जनतेला आणि विद्यार्थ्यांना समजावून सांगितली. राहुल गांधी हे सध्या नरेंद्र मोदी यांचे जे परराष्ट्र धोरण आहे ते या अशा पद्धतीने समजावून सांगत आहेत, त्याची जर देवेंद्र फडणवीस खिल्ली उडवत असतील तर ते हादरलेले आहेत. राहुल गांधी यांचा विषय लोकांपर्यंत पोहोचतो. राहुल गांधींना पप्पू ठरवण्यासाठी या लोकांनी शेकडो कोटी खर्च केले. त्याच राहुल गांधींनी नरेंद्र मोदींना पप्पू ठरवलं आहे. मोदी पप्पू आहेत. राहुल गांधी पप्पू नाहीत. राहुल गांधी हे देशाचे नेते आहेत, असा हल्लाबोल त्यांनी केलाय.
 
हा कॉमेडियनच्या वरचा प्रकार
मोदींच्या वाढदिवसाला दिवे पेटवण्याचा कार्यक्रम झाला तो काय प्रकार होता? हा कॉमेडियनच्या वरचा प्रकार आहे. मिस्टर मोदी लोकसभेत आणि बाहेर ज्या पद्धतीने अनेक कॉमेडीचे प्रकार गेल्या काही काळापासून करत होते, मग पंडित नेहरू असतील, सोनिया गांधी असतील, राहुल गांधी असतील, त्यांची जी कॉमेडी करत होते तो काय प्रकार होता? असे म्हणत संजय राऊत यांनी पंतप्रधान मोदी यांची मिमिक्री करत हल्लाबोल केला. 

देशात दोन जोकर, महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात जोकरांची फौज
संजय राऊत पुढे म्हणाले की, देशाचा पंतप्रधान लोकसभेत अशा चिपळ्या वाजवतो का? तो काय प्रकार आहे मिस्टर फडणवीस? तुम्हाला लोकांनी जोकर ठरवले आहे. देशात दोन जोकर आहेत आणि महाराष्ट्रात तर काय जोकरांची फौजच आहे कॅबिनेटमध्ये. त्यावर बोलले तर बरं होईल, असे म्हणत त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही निशाणा साधला. 

विरोधी पक्षाला उत्तम नट असावे लागते
राहुल गांधी या देशाचे नेते आहेत, विरोधी पक्ष नेते आहेत आणि या देशाच्या परिस्थितीचे भान ठेवून अंधभक्तांना देशाचं आर्थिक आणि परराष्ट्र धोरण कसं कोसळलं आहे हे अत्यंत सोप्या शब्दात ते समजावून सांगतात. त्यासाठी ते काही अ‍ॅक्शन करतात. विरोधी पक्षाला उत्तम नट असावे लागते. विरोधी पक्षाला सोप्या भाषेत सांगण्यासाठी अभिनय करावा लागतो. अभिनयाचा ठेका काय फक्त मोदींनीच घेतला आहे का? राहुल गांधी अभिनय करू शकतात, राज ठाकरे करू शकतात, उद्धव ठाकरे करू शकतात. आमचे काँग्रेसचे अध्यक्ष खरगे उत्तम अभिनय करतात. तुम्ही त्यांची भाषणे बघा. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांनी थोड संयमाने घेतले पाहिजे, त्यांना पण लवकरच दिल्लीत जायचे आहे. त्यांना माहिती आहे. सगळे ठरलेले आहे. त्यांना दिल्लीत गेल्यावर या सगळ्या गोष्टींशी सामना करावा लागणार आहे, असे देखील त्यांनी म्हटले.