विमानात बसण्यापूर्वी राहुल गांधींचं ट्विट, स्टॅलिन यांचा तात्काळ रिप्लाय, डिलिमिटेशनबाबत महत्त्वाची अपडेट

Foto
नवी दिल्ली :  लोकसभेत मोदी सरकारच्यादृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण असलेले मतदारसंघ पुर्नरचना अर्थात डिलिमिटेशन विधेयकाच्या पार्श्वभूमीवर आज रविवारी सकाळी राहुल गांधी आणि सोनिया गांधी हे दोघे स्वत: द्रमुकचे सर्वेसर्वा एम.के. स्टॅलिन यांच्या भेटीसाठी विशेष विमानाने चेन्नईला रवाना झाले आहेत. विमानात बसण्यापूर्वी राहुल गांधी यांनी स्टॅलिन यांना उद्देशून एक ट्विट केले होते. यामध्ये राहुल गांधी यांनी स्टॅलिन यांना भाऊ असे संबोधत लोकशाहीच्या रक्षणासाठी उभे राहण्याचे आवाहन केले होते.

दरम्यान राहुल गांधी यांच्या या ट्विटला काहीवेळातच एम.के. स्टॅलिन यांनी रिप्लाय दिला आहे.  भारतीय राज्यघटनेचे संरक्षण आणि राज्यांचे अधिकार अबाधित ठेवण्यासाठी द्रमुकने ऐतिहासिक भूमिका बजावली आहे. राहुल गांधी यांनी या योगदानाची दखल घेतल्याबद्दल स्टॅलिन यांनी त्यांचे आभार मानले आहेत. 

स्टॅलिन यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, तामिळनाडू आणि तिथल्या तमिळ जनतेचे हित हेच द्रमुकसाठी नेहमी सर्वोच्च प्राधान्य राहिले आहे. पक्षाने घेतलेला प्रत्येक निर्णय राज्याच्या आणि जनतेच्या हिताचा विचार करूनच घेतला आहे. राज्यांच्या अधिकारांबाबत, संघराज्य व्यवस्थेबाबत आणि राज्यघटनेने दिलेल्या अधिकारांबाबत द्रमुकची भूमिका कायम ठाम राहिली आहे. या भूमिकेशी कोणत्याही परिस्थितीत तडजोड केली जाणार नाही, असा निर्धारही त्यांनी व्यक्त केला. इतिहास आम्हाला कट्टाबोम्मन म्हणून लक्षात ठेवेल, एट्टप्पन म्हणून नाही! त्यामुळे कालपर्यंत द्रमुक भाजपला साथ देणार असे वाटत असताना आता स्टॅलिन ऐनवेळी पु्हा इंडिया आघाडीच्या बाजूने उभे राहून डिलिमिटेशन विधेयकाच्या विरोधात मतदान करणार का, हे पाहावे लागेल.