छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो) : शहरातील रहाळपट्टी तांडा परिसरात घरगुती हातभट्टी दारू अड्डयावर छापा टाकण्यात आला. याप्रकरणी पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई २१ फेब्रुवारी रोजी सकाळी करण्यात आली.
या प्रकरणी गुन्हे शाखेचे योगेश डोंगर नवसारे यांनी फिर्याद दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी राजू हारसींग चव्हाण (वय ३९) व ताराचंद हारसींग चव्हाण (वय ४१, दोघे रा. रहाळपट्टी तांडा) यांच्या घरावर छापा टाकण्यात आला. कारवाईदरम्यान आरोपींच्या घरातून गुळ व मिश्रणयुक्त पदार्थ वापरून तयार केलेली तसेच सडविण्यासाठी ठेवलेली गावरान हातभट्टी दारू, स्टीलचे टिप, प्लास्टिक कॅन व बकेट, तसेच दारू तयार करण्यासाठी लागणारे साहित्य असा एकूण सुमारे १३ हजार ९०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
पोलिस तपासात आरोपी हे स्वतःच्या घरात चुलीवर भट्टी पेटवून हातभट्टी दारू तयार करून विक्रीच्या उद्देशाने साठवून ठेवत असल्याचे समोर आले. याप्रकरणी भारतीय न्याय संहिता कलम ६५ (ब), ६५ (क), ६५ (ई) व ६५ (फ) अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.












