सिल्लोड, (प्रतिनिधी) : सिल्लोड ते भवन रोडवरील भवन शिवारात काळे पेट्रोलपंपाच्या मागे पत्र्याच्या शेडमध्ये २२ नोव्हेंबर रोजी रात्री ७.३० वाजता सुरू असलेल्या तिरट नावाच्या पत्त्यांच्या जुगारावर स्थानिक गुन्हे शाखेने छापा टाकला. यावेळी जुगार खेळणारे व खेळविणारे १० जण पोलिसांच्या हाती लागले, तर पोलिसांना पाहून अन्य सात जण दुचाकी घटनास्थळी सोडून पसार झाले. घटनास्थळावरून एकूण १० लाख २४ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांनी जुगार खेळ खेळणाऱ्या रईसखॉ अनीसखॉ (वय ३९, सिल्लोड), कैलास कडुबा भाले (वय ४७, सिल्लोड), समाधान दत्तात्रय सुस्ते (वय ३६, भवन), महंमदशहा अन्वरशहा (वय ५५, सिल्लोड), शेख जमीर शेख सलीम (वय ४६, भराडी), मनोज साहेबराव खंबाट (वय ४७, टिळकनगर, सिल्लोड), शेख कलीम शेख अमीर (वय ५१, गुलशननगर, सिल्लोड), अन्वर भिकन बागवान (वय ५३, सिल्लोड), शेख मसुद शेख पाशु (वय ५५, ईदगाहनगर, सिल्लोड), शक्तीसिंग (रा. इंदिरानगर, सिल्लोड), क्लब चालक यांना रंगेहाथ पकडले व कार्यवाही करून जामिनावर सोडून दिले. पोलिसांना पाहून घटनास्थळावरून पसार झालेल्या सात जणांच्या दुचाकी तेथेच आढळल्या.
भवन येथे जुगार सुरू असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक महेश घुगे यांच्या नेतृत्वाखाली पोहेकॉ संतोष डोंगरे, गोपाल पाटील, बलविरसिंग बहुरे, शिवाजी मगर, सुनील गोरे व सचिन राठोड यांनी सापळा रचून छापा टाकला. घटनास्थळी दहा जण जुगार खेळताना व खेळविताना आढळले. याप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेचे पोहेकॉ संतोष डोंगरे यांनी दिलेल्या तक्रार वरूनसिल्लोड ग्रामीण पोलीस ठाण्यात मुंबई जुगार कायद्या नुसार वरील १७ लोकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील सहायक पोलीस निरीक्षक रवींद्र ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ रविकिरण भारती करीत आहेत. वाहने पुढीलप्रमाणे :
स्प्लेंडर प्रो एमएच २० सीएल ७८९८, स्प्लेंडर प्रो एमएच २० पीएन ३२७०, वाहन एमएच १४ सीई ८९९१ (मोटर सायकल), युनिकॉन एमएच २० एचपी ३७६०, हिरो स्प्लेंडर एमएच २० एचपी १६२२, एचएफ डिलक्स एमएच २० डीए ७०६०, फ़ेशन एमएच २० सीएल ७४७१, वरील वाहनांच्या मालका विरुद्ध पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहे.















