छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो) : जिल्ह्यात गोदावरी, सुखना आणि गिरिजा नदीपात्रातून बेधडक सुरू असलेल्या अवैध वाळू उपशाविरुद्ध पोलिसांनी धडक मोहीम हाती घेतली आहे. गत दोन दिवसांत वैजापूर, पैठण आणि फुलंब्री तालुक्यांत पोलिसांनी केलेल्या वेगवेगळ्या कारवायांमध्ये दोन ट्रॅक्टर व एका वाहनासह सुमारे नऊ लाखांहून अधिक रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
वैजापूर तालुक्यातील वांजरगाव शिवारात गोदावरी नदीपात्रातून अवैध वाळू उपसा करणार्या एका टाटा इंट्रा वाहनावर वीरगाव पोलिसांनी छापा टाकला. पळून जाण्याच्या प्रयत्नात वाहन वाळूत फसल्याने पोलिसांनी चालक शुभम भागवत त्रिभुवन (वय २१, रा. श्रीरामपूर) याला अटक केली. यात ३ लाख ३ हजारांचा मुद्देमाल जप्त केला. दुसरी कारवाई आडूळजवळील घारेगाव (ता. पैठण) येथील सुखना नदीपात्रात करण्यात आली. पाचोड पोलिसांनी रविवारी (दि. १४) वाळूने भरलेला विनाक्रमांक ट्रॅक्टर ताब्यात घेतला. यात ६ लाख ५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. तर फुलंब्री तालुक्यातील कान्होरी येथील गिरिजा नदीपात्रात शनिवारी (दि.१३) रात्री साडेदहाच्या सुमारास फुलंब्री पोलिसांनी धाड टाकून वाळूने भरलेला ट्रॅक्टर जप्त केला. या प्रकरणी चालक अण्णा श्रीखंडे (वय २३) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.









