रायगड : खोपोली मधील मंगेश काळोखे हत्या प्रकरणासंदर्भात नवी अपडेट समोर आली आहे. या हत्येच्या प्रकरणाचा छडा लावण्यात पोलिसांना यश आलं आहे. मंगेश काळोखे हत्या प्रकरणातील मुख्य २ आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. रवींद्र देवकर आणि त्यांचा त्यांचा मुलगा दर्शन रवींद्र देवकर याला रायगड पोलिसांनी अटक करत ताब्यात घेतलं आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक आचल दलाल यांच्या मार्गदर्शनाखाली ८ वेगवेगळ्या टीम तपासाठी कार्यरत होत्या. या तपासात खोपोली, नवी मुंबई, मुंबई एअरपोर्ट, रायगडसह अन्य परिसरात ८ टीम काल पासून कार्यरत असून आरोपींचा शोध घेत होते.
अशातच, रायगड जिल्ह्यातील नागोठणे येथे आज सकाळी रवींद्र देवकर, दर्शन देवकर यांच्या गाडीला पोलिसांनी गाडी आडवी टाकून पकडल्याची माहिती आहे. तर हत्येची घटना घडल्यानंतर २६ तासात मुख्य आरोपी असलेले रवींद्र देवकर यांना अटक करण्यात रायगड पोलिसांना मोठं यश आलं आहे.
पुढे आलेल्या माहितीनुसार, मंगेश काळोखे यांची पत्नी मानसी काळोखो यांनी याच देवकर परिवाराविरोधात नगरपालिकेची निवडणूक लढवली होती. त्यांनी देवकर परिवारातील महिला उमेदवाराचा पराभव करीत त्या शिवसेना पक्षातून नगरसेविका झाल्या होत्या. अशातच आज मंगेश काळोखे हत्या प्रकरणी आज समर्थकांकडून ठिय्या आंदोलन करण्यात येतंय. आमदार महेंद्र थोरवे यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात येतंय.
आमदार महेंद्र थोरवे आणि समर्थकांकडून खोपोली परिसरात ठिय्या आंदोलन
खोपोलीमधील मंगेश काळोखे हत्येप्रकरणी २४ तास उलटून सुद्धा आरोपींना अटक होत नसल्याने स्थानिक आमदार महेंद्र थोरवे आणि समर्थकांकडून खोपोली मधील परिसरात ठिय्या आंदोलन करणार आलंय. मंगेश काळोखे यांची काल सकाळी ७ वाजता हत्या करण्यात आली होती. या हत्येनंतर खोपोलीमध्ये कालपासून तणावाचे वातावरण आहे. काल दिवसभर काळोखे यांच्या समर्थकांनी खोपोली पोलीस स्टेशनला घेराव घालून आरोपींना अटक करण्याची मागणी केली होती. त्यानंतर फरार असलेले आरोपी अजूनही पोलिसांच्या हाती लागत नसल्याने संतप्त जमावाकडून आज ठिय्या आंदोलन होणार असल्याची माहिती आहे. मात्र आता आरोपींना अटक करण्यात आल्याने हे आंदोलन थांबणार का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
नेमकं काय घडलं?
खोपोली नगरपालिकेच्या शिंदे सेनेच्या नगरसेविका मानसी काळोखे यांच्या पतीची शुक्रवारी सकाळी ७ वाजता निर्घुण हत्या झाल्याची धक्कादायक घटना घडली. यावेळी घटनास्थळाजवळ असलेल्या काही नागरिकांनी हल्लेखोरांना पाहिले असता ते हल्लेखोर काळ्या रंगाच्या वाहनातून आल्याची माहिती समोर आली. मात्र हे आरोपी घटनास्थळावरून फरार झाले.
खोपोली पोलीस या हल्लेखोरांचा शोध घेत असून मंगेश काळोखे यांच्या हत्येमागे नक्की कोणाचा हात आहे याबाबतीत पोलीस अधिक माहिती घेत आहेत. दरम्यान याप्रकऱणी राष्ट्रवादीच्या एकूण दहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.