फुकट्यांवर रेल्वे विभागाची करडी नजर

Foto
दोन दिवसांत २ हजार ९१७ प्रवाशांवर कारवाईचा बडगा; मोहीम तीव्र
छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो) सणासुदीच्या काळात रेल्वेगाड्यांमध्ये प्रवाशांची मोठी गर्दी होत असताना विनातिकीट आणि अनियमित प्रवास करणाऱ्या प्रवाशांविरुद्ध रेल्वे प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारला आहे. वैध तिकीट काढून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना जागा मिळावी, त्यांची गैरसोय टाळावी आणि रेल्वे प्रवास अधिक सुरक्षित व शिस्तबद्ध व्हावा, यासाठी दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागाने विशेष तिकीट तपासणी मोहीम तीव्र केली आहे. या मोहिमेअंतर्गत सलग दोन दिवस विविध रेल्वेगाड्यांमध्ये तपासणी करण्यात आली. यात तब्बल २ हजार ९१७ प्रकरणे उघडकीस आली.
दिवाळी आणि त्यानंतरच्या सणासुदीच्या काळात गावाकडे जाणारे प्रवासी, नातेवाइकांकडे जाणारे नागरिक तसेच कामानिमित्त प्रवास करणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढते. त्यामुळे रेल्वेगाड्यांमध्ये गर्दीचे चित्र पाहायला मिळते. अशा परिस्थितीत काही प्रवासी विनातिकीट प्रवास करतात, तर काही जण आरक्षित डब्यांमध्ये अनधिकृतपणे प्रवेश करून प्रवास करतात. यामुळे नियमानुसार तिकीट काढून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो.
विशेषतः गर्दीच्या काळात आरक्षित डब्यांमध्ये अनधिकृत
प्रवाशांची संख्या वाढल्याने प्रवाशांच्या सुरक्षिततेचाही प्रश्न निर्माण होतो. ही बाब लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनाने तपासणी मोहिमेला गती दिली आहे. विशेष तपासणी
मोहीम मध्यरात्री १२ वाजल्यापासून रात्री ११ वाजून ५० मिनिटांपर्यंत राबविण्यात आली. जवळपास संपूर्ण दिवस चाललेल्या या मोहिमेत ३१ तिकीट तपासणी कर्मचारी आणि रेल्वे सुरक्षा दलाचा एक कर्मचारी सहभागी झाला होता. विविध पथकांच्या
माध्यमातून विभागातील एकूण २६ रेल्वेची तपासणी करण्यात आली. या तपासणीदरम्यान प्रत्येक डब्यातील प्रवाशांची तिकिटे तपासण्यात आली. तसेच विनातिकीट, अनियमित प्रवास आणि विनानोंदणी सामान घेऊन जाणाऱ्या प्रवाशांवर नियमानुसार कारवाई करण्यात आली.
२५ लाखांहून अधिक वसुली
नांदेड विभागात विशेष तिकीट तपासणी मोहीम राबविण्यात आली. या दिवसभरात रेल्वेच्या विविध गाड्यांमध्ये तपासणी करताना विनातिकीट आणि अनियमित प्रवासाची पहिल्या तपासणीत १ हजार ४१५ प्रकरणे उघडकीस आली. या प्रकरणांतून रेल्वे प्रशासनाने १२ लाख १९ हजार ४६५ रुपयांची रक्कम वसूल केली. तर दुसऱ्या दिवशी तपासणीत १ हजार ५०२ प्रकरणे आढळून आली. त्यातून भाडे आणि दंडापोटी १३ लाख ५६ हजार ४७५ रुपयांची वसुली करण्यात आली. अशा प्रकारे अवघ्या दोन दिवसांत २ हजार ९१७ प्रकरणे उघडकीस आणत २५ लाख ७५ हजार ९४० रुपयांची वसुली करण्यात रेल्वे प्रशासनाला यश आले आहे.
विनातिकीटची सर्वाधिक ९१४ प्रकरणे
तपासणीमध्ये विनातिकीट प्रवास करणाऱ्यांची संख्या सर्वाधिक असल्याचे समोर आले. विनातिकीट प्रवासाची ९१४ प्रकरणे आढळली. याशिवाय अनियमित प्रवासाची ४२१ प्रकरणे, तर विनानोंदणी सामान घेऊन जाण्याची १६७ प्रकरणे उघडकीस आली. अशा एकूण १ हजार ५०२ प्रकरणांमध्ये रेल्वे प्रशासनाने नियमानुसार भाडे आणि दंड वसूल केला. आगामी काळातही नांदेड विभागातील विविध रेल्वेमध्ये अचानक तिकीट तपासणी केली जाणार असल्याने विनातिकीट प्रवास करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. सणासुदीच्या गर्दीत प्रामाणिक प्रवाशांचा प्रवास सुरक्षित आणि सुखकर करण्यासाठी रेल्वे प्रशासनाने तपासणीचा धडाका कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
https://epaper.sanjwarta.in/Powered By: Vrudhee Solutions