छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो) : मराठवाड्यात पुढील चार दिवस म्हणजेच २४ मार्चपर्यंत हलका ते मध्यम स्वरुपात पाऊस पडण्याची शक्यता आहे, असा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने व्यक्त केला आहे.
मराठवाड्यात अवकाळी पावसाने फळबागा आणि रब्बी पिकांचे नुकसान झाले आहे. तीन दिवसांपासून विभागात सर्वत्र मध्यम ते जोरदार पाऊस झाल्याने वादळामुळे पिके आडवी झाली आहेत. तुरळक ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता आहे. छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली, लातूर, धाराशिव आणि नांदेड जिल्ह्यात शुक्रवारी वेगवेगळ्या भागात पावसाने हजेरी लावली. वादळासह झालेल्या पावसामुळे पिकांचे नुकसान झाले आहे. जोरदार पाऊस आणि गारपीट झालेल्या भागात पिके आडवी पडली आहेत. आंब्यांची फळगळती झाली असून हिंगोली जिल्ह्यात केळी व हळद पिकाचे नुकसान झाले आहे. नांदेड, बीड जिल्ह्यात २३ आणि २४ मार्च रोजी हलक्या ते मध्यम स्वरुपात पावसाची शक्यता आहे. परभणी आणि हिंगोली जिल्ह्यात २४ मार्चला पावसाची शक्यता आहे.
संभाजीनगरात ५ दिवस ढगाळ वातावरण
विभागात पुढील चार दिवस तुरळक ठिकाणी पाऊस होणार असल्याने शेतकर्यांनी पिकांचे नुकसान टाळण्यासाठी उपाययोजना करण्याचे आवाहन कृषीतज्ज्ञांनी केले आहे. दरम्यान, प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई यांनी दिलेल्या अंदाजानुसार छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पुढील पाच दिवसात आकाश अंशत: ढगाळ राहणार आहे. तसेच कमाल तापमान ३५ ते ३८ अंश सेल्सिअस दरम्यान राहील. जिल्ह्यात २५ ते ३१ मार्च दरम्यान हवामान कोरडे व आकाश स्वच्छ राहणार आहे, असे जिल्हा कृषी हवामान केंद्राने कळविले आहे.
पशुधनाचे नुकसान
जालना व छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात अवकाळी पाऊस, गारपीट व वादळामुळे शेती व पशुधनाचे नुकसान झाले आहे. या नुकसानीबाबत तात्काळ पंचनामे करुन शेतकर्यांना आर्थिक मदत देण्याची मागणी खासदार डॉ. कल्याण काळे यांनी केली आहे. याबाबत काळे यांनी दोन्ही जिल्ह्यांच्या जिल्हाधिकारी यांना मागण्यांचे निवेदन दिले आहे. काढणीस आलेले गहू, ज्वारी, हरभरा, करडई पिके आणि द्राक्षे, आंबा, केळी, मोसंबी या फळपिकांचे नुकसान झाल्याचे निवेदनात म्हटले आहे.












