फुलंब्री, (प्रतिनिधी) : शहरात शुक्रवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसाने विकासकामांच्या गुणवत्तेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे.
खुलताबाद रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने रस्त्याला अक्षरशः नदीचे स्वरूप प्राप्त झाले. हे पाणी परिसरातील ७ ते दुकानांमध्ये शिरल्याने व्यापाऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. पावसानंतर रस्त्यावर सर्वत्र गाळ साचल्याने हा सिमेंट रस्ता की चिखलाचा, असा संतप्त सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.
खुलताबाद रस्त्याचे काम पूर्ण झाले असले तरी पावसाच्या पाण्याचा निचरा करण्यासाठी आवश्यक असलेली नाली अद्याप अपूर्ण आहे. राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या दुर्लक्षामुळे ही नाली गेल्या अनेक वर्षांपासून रखडल्याचा आरोप स्थानिक नागरिक व व्यापाऱ्यांनी केला आहे. शुक्रवारी झालेल्या पावसामुळे नाली अभावी पाण्याचा प्रवाह थेट दुकानांकडे वळला. अनेक व्यापाऱ्यांना रात्रभर पाणी उपसून माल सुरक्षित ठेवावा लागला.
नालीतील चिखल आणि कचरा रस्त्यावर आल्याने नवीन सिमेंट रस्ता चिखलाने माखला असून दुचाकी घसरून अपघात होत आहेत. अपूर्ण नालीचे काम तातडीने पूर्ण करून नुकसानग्रस्त व्यापाऱ्यांना भरपाई द्यावी, अशी मागणी होत आहे. संबंधित विभागाने कायमस्वरूपी उपाययोजना न केल्यास भविष्यात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा स्थानिक व्यापारी व नागरिकांनी दिला आहे.












