ऐन गणेशोत्सवात पावसाचा जोर वाढणार! आयएमडीकडून अलर्ट जारी

Foto
मुंबई : देशातील मान्सून पुन्हा एकदा सक्रिय झाला असून पुढील काही दिवस विविध राज्यांत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. ११ सप्टेंबरच्या सुमारास बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याचा अंदाज असून, याचा मोठा प्रभाव मध्य, पूर्व आणि दक्षिण भारतावर दिसून येईल, असा इशारा भारतीय हवामान विभागाने दिला आहे. महाराष्ट्रातील कोकण, गोवा, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्राच्या काही भागांत १२ ते १४ सप्टेंबर दरम्यान जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार, कोकण आणि गोव्यात ८ ते १४ सप्टेंबर या संपूर्ण कालावधीत बहुतांश ठिकाणी पाऊस हजेरी लावेल, तर १२ आणि १३ सप्टेंबर रोजी काही भागांत मुसळधार पाऊस पडू शकतो. विदर्भात १२ सप्टेंबर रोजी मुसळधार पावसाची शक्यता असून ८ ते १४ सप्टेंबर दरम्यान वादळी वार्‍यासह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे.

मध्य महाराष्ट्रात १३ आणि १४ सप्टेंबर रोजी पावसाचा जोर वाढेल, तसेच १३ सप्टेंबर रोजी तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडेल. मराठवाड्यात ११ आणि १२ सप्टेंबर दरम्यान विजांच्या कडकडाटासह पाऊस होण्याचा अंदाज आहे. हवामान खात्यानुसार, १० सप्टेंबर रोजी ओडिशाच्या काही भागांत मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस कोसळू शकतो. तसेच १२ सप्टेंबर रोजी पूर्वोत्तर भारतातील अरुणाचल प्रदेशातही अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. 

उत्तराखंड, छत्तीसगड, मध्य प्रदेश, झारखंड, बिहार, पश्चिम बंगाल, तेलंगणा आणि किनारपट्टीच्या आंध्र प्रदेशातही ११ ते १४ सप्टेंबर दरम्यान मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
सततच्या पावसामुळे शेतात पाणी साचून पिकांचे नुकसान होऊ नये, यासाठी पाण्याचा निचरा योग्य प्रकारे करण्याची खबरदारी घेण्याचे आवाहन हवामान विभागाने केले आहे. तसेच अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता असल्याने मच्छिमारांनी समुद्रात जाऊ नये, असा स्पष्ट इशारा देण्यात आला आहे. गणरायाच्या आगमनाला आता आठवड्यापेक्षाही कमी कालावधी उरला आहे. सगळीकडे बाप्पााच्या आगमनाची तयारी सुरू आहे. पण, आता हवामान विभागाने १२ सप्टेंबर पासून पावसाचा इशारा दिला आहे. त्यामुळे ऐन गणेशोत्सवात पाऊस बरसणार असल्याच्या अंदाज आहे.