मुंबई : शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने प्रस्तावित मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाला पाठिंबा देण्याच्या भूमिकेने राजकीय भूकंप झाला आहे. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांबद्दल केलेली भविष्यवाणी खरी ठरताना दिसू लागली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी २०२३ मध्ये केले भाष्याचा उल्लेख करत पवारांच्या राष्ट्रवादीवर निशाणा साधला आहे.
राज ठाकरे यांनी २ जुलै २०२३ रोजी एक पोस्ट लिहिली होती. त्या पोस्टमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांबद्दल राजकीय भाष्य आणि भविष्यवाणी केली होती.
राज ठाकरे म्हणाले, 'राष्ट्रवादीची दुसरी टीम निघाली आहे'
मनसे अध्यक्ष राज ठाकरे म्हणाले की, "२ जुलै २०२३ ला जेंव्हा राष्ट्रवादीची एक टीम फुटून भाजपच्या दिशेने सरकली होती त्यावेळेस मी हे बोललो होतो. अर्थात पुढे ३ वर्ष दोन्ही राष्ट्रवादी पक्षांनी यथोचित भांडणाचं नाटक केलं आणि मी म्हणलं तसं सत्तेच्या सोपानासाठी दुसरी टीम आता हलकारे देत निघाली आहे. मी मध्ये एकदा म्हणलं होतं की हे पवारांचं जंतरमंतर आहे, जे फार थोड्या लोकांना कळतं. असो", अशा शब्दात ठाकरेंनी भाष्य केले.
राज ठाकरे यांनी २०२३ मध्ये काय पोस्ट लिहिली होती?
आज महाराष्ट्राचा सिंहासन सिनेमातील शेवटच्या दृश्यातील ‘दिगू टिपणीस’ झाला. उद्धव ठाकरेंचं ओझं शरद पवारांना उतरवायचं होतं, त्याचा पहिला अंक आज पार पडला. पवारांची (राष्ट्रवादीची) पहिली टीम सत्तेच्या दिशेने रवाना झाली, यथावकाश दुसरी पण सत्तेच्या सोपानासाठी रुजू होईलच! तसंही महाराष्ट्र भाजपला शिंदेंना दिलं जाणारं (अवास्तव) महत्व रुचत नव्हतंच, त्यावर अनायसे उतारा शोधला.
ह्यात देशासमोर चित्रं काय उभं राहतंय, तर महाराष्ट्राच्या राजकारणाचा झालेला चिखल. ज्या राज्याने देशाचं प्रबोधन केलं, त्या राज्याचं राजकारण इतक्या खालच्या स्तराला गेलं आहे हे पाहून जीव तुटतो आणि महाराष्ट्राच्या पुढे अजून काय काय वाढून ठेवलंय हा विचार करून मनात धस्स होतं.
बाकी महाराष्ट्रातील जनता बेसावध आणि सोशिक आहे ह्याची खात्री असल्यामुळे ह्या सगळ्यांचे सत्तेच्या सिंहासनासाठीचे खेळ असेच सुरु राहणार की येत्या निवडणुकांमध्ये महाराष्ट्रातील जनता सत्तेचं हे किळसवाणं राजकारण बंद पाडणार?