नरेंद्र मोदी, गडकरी, फडणवीसांच्या फेकाफेकीने लक्ष्मीही आश्चर्यचकित!

Foto

मुंबई – साडेचार वर्षांपासून पतंप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या फेकाफेकीने देवी लक्ष्मीही आश्चर्यचकित झाली आहे. लक्ष्मीपूजनाच्या निमित्ताने साकारलेल्या व्यंगचित्रात, कोट्यवधींच्या विकासकामाच्या बाता मारणाऱ्या भाजप सरकारच्या थापा ऐकून लक्ष्मीही अवाक् झाल्याचे राज ठाकरे यांनी दाखविले आहे.

काय आहे व्यंगचित्रात

'लक्ष्मीपूजन' या शिर्षकाखाली महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी मोदी, गडकरी आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहेे. या तिन्ही फोटोसमोर देवी लक्ष्मी आश्चर्यचकित होऊन उभी असल्याचे दाखविले आहे. पंतप्रधान मोदी, केंद्रीय मंत्री गडकरी आणि मुख्यमंत्री फडणवीस यांच्या फोटोकडे पाहात दोन्ही पात पसरवून लक्ष्मी विचारते, बाबांनो, गेल्या साडेचार वर्षात तुम्ही जनतेसमोर फेकलेले हजारो लाखो कोटींमधले आकडे ऐकून मीही थक्क झाले!’  

केंद्राच्या साडेचार आणि राज्य सरकारच्या चार वर्षांच्या कार्यकाळात मोदी-फडणवीस सरकारने जनतेला फक्त कोट्वधींची आश्वासने दिली, या फक्त थापा असल्याचा टोला राज ठाकरे यांनी व्यंगचित्रातून हाणला आहे.

दिवाळीच्या निमित्ताने राज ठाकरे रोज वेगवेगळी व्यंगचित्रे फेसबुक आणि ट्विटरवर प्रसिद्ध करत आहेत. त्यांच्या रंग-रेषांच्या फटकाऱ्याने भाजपला ते लक्ष्य करत आहेत. यावर भाजपकडून अद्याप प्रतिक्रिया आलेली नाही. राज ठाकरे यांच्या कुंचल्यातून आणखी कोणती राजकीय भाष्य करणारी व्यंगचित्रे साकारली जातात याची सर्वांनाच उत्सूकता आहे.