मोदी सरकारच्या काळात देश 'आयसीयू' मध्ये, राज ठाकरेंनी व्यंगचित्रातून भाजपला फटकारले

Foto

मुंबई – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा मोदी सरकारला आपल्या व्यंगचित्रातून फटकारले आहे. आज धनत्रयोदशी निमित्त प्रसिद्ध केलेल्या व्यंगचित्रातून त्यांनी भारत देशावर गेल्या साडेचार वर्षात खूप अत्याचार झाले. देश आयसीयूमध्ये असून येत्या २०१९ च्या लोकसभा निवडणुकीनंतर शुद्धीवर येईल असे सुचक वक्तव्य राज ठाकरेंनी या व्यंगचित्राच्या माध्यमातून केले आहे.

राज ठाकरे यांनी रविवारी जाहीर केले होते की दिवाळीच्या निमित्ताने व्यंगचित्रांची मालिका घेऊन येणार आहे. या मालिकेतील पहिले व्यंगचित्र सोमवारी धनत्रयोदशीच्या निमित्ताने प्रसिद्ध केले आहे. व्यंगचित्रात धन्वंतरी देवता आयसीयूच्या बाहेर उभी आहे. तर त्यांच्याभोवती जनतेने गर्दी केली असून ते प्रश्नार्थक चेहऱ्याने धन्वंतरी देवतेकडे पाहात आहे. या त्रस्त लोकांना देवता सांगते, काळजीचे कारण नाही! परंतू गेल्या साडेचार वर्षात त्याच्यावर खूप अत्याचार झालेत! लोकसभा निवडणुकीनंतर येईल शुद्धीवर!’

भारत देश सध्या आयसीयूमध्ये असल्याचे दाखवून त्याला बाहेर येण्यासाठी आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपच्या मोदी सरकारला घालवावे लागले, असेच एक प्रकारे राज ठाकरे यांनी सुचित केले आहे.

सोमवारी प्रसिद्ध झालेल्या कार्टूनवर सहा तासांत साडे आठ हजारांपेक्षा जास्त रिअक्शन आल्या आहेत. १३०० पेक्षा जास्त नेटकऱ्यांनी हे व्यंगचित्र शेअर केले आहे तर २५० पेक्षा जास्त त्यावर कॉमेंट्स आल्या आहेत.